माणुसकी : सोसायटीतील नागरिकांच्या मदतीमुळेच कोरोनाला हरवणे सोपे गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:38 PM2020-05-23T19:38:03+5:302020-05-23T19:39:51+5:30
कोरोनामुक्त झालेल्या शिक्षिकेने व्यक्त केली भावना
- राम शिनगारे
औरंगाबाद : कोरोनाची बाधा झालेल्या कुटुंबातील व्यक्तींवर समाजात बहिष्कार टाकण्याच्या घटना समोर येत आहेत. दवाखान्यात सेवा देतात म्हणून परिचारिकेच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला. मात्र, सातारा परिसरातील स्काय सिटी या सोसायटीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या कुटुंबाच्या पाठीशी अख्खी सोसायटी उभी राहिली. या मानसिक आधारामुळेच या जीवघेण्या आजारावर मात करून सुखरूपपणे घरी आले असल्याची भावना जि.प.च्या शाळेतील शिक्षिका स्नेहल किरण शिर्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सगळीकडे कोरोनाची साथ सुरू होती. अचानक थोडासा ताप आला. आम्ही जवळच्या हॉस्पिटलला गेलो, तर त्यांनी तपासणी केली नाही. तेथून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याठिकाणी तपासण्या केल्या तेव्हा न्यूमोनिया असेल, असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी कोविड-१९ ची तपासणी करण्यासाठी स्वॅब घेतला. हा स्वॅब सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याचे समजताच आम्ही नवरा- बायको हादरून गेलो. कारण आम्हाला एक वर्षाची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. नवऱ्यासह दोन मुलांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असेल असे वाटले; पण सुदैवाने तिघांचाही अहवाल निगेटिव्ह आला.
मी दवाखान्यात उपचार घेत असताना दोन मुलांचे काय होणार? असा प्रश्न सतत मनात येत होता; पण सोसायटीतील लोक कुटुंबातील सदस्यांसारखे धावून आले. त्यांनी प्रत्येकांनी एक-एक दिवसाची जबाबदारी घेऊन सकाळी दूध, नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण घरपोच दिले. त्यामुळे माझ्या मनावरचा भार हलका झाला आणि कोरोनाला हरविण्याचे बळ मिळाले. त्यांचे ऋण आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कोरोनावर निश्चित मात करता येते
कोरोनावर मात करून घरी आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण करून घेतले आहे. या काळात महापालिका प्रशासन, पोलीस यांच्यासह सोसायटीतील नागरिक आणि बिल्डर यांनी मोलाचे सहकार्य केले. या सहकार्यामुळेच कोरोनावर मात करता आली. तरीही प्रत्येकाने घरीच थांबले पाहिजे. या नियमाचे पालन केल्यास आपण निश्चितपणे सुरक्षित राहू शकतो, असेही शिर्के म्हणाल्या.
सोसायटीतील नागरिक जिवाभावाचे ठरले
कोरोना झालेल्या कुटुंबाची होणारी परवड आम्ही विविध माध्यमांतून वाचत आहोत, पाहत आहोत. हीच वेळ माझ्या कुटुंबावर आल्यानंतर स्काय सिटी ही आमची सोसायटी ज्याप्रमाणे आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली. त्यावर विश्वास बसत नाही. अशाच पद्धतीने प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीला नागरिक धावले तर कोरोनाचे संकट लवकरच आपण संपवू शकतो.
-किरण शिर्के, कोरोनामुक्त शिक्षिकेचे पती