'नम्र विनंती आहे की, आमच्या शाळा बंद करू नका'; झेडपी विद्यार्थ्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
By राम शिनगारे | Published: October 10, 2023 01:17 PM2023-10-10T13:17:31+5:302023-10-10T13:18:14+5:30
जि. प. शाळांसाठी आसेगावच्या चिमुरड्यांचे मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जि. प.च्या शाळा बंद करून इतर शाळांना विद्यार्थी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास विविध क्षेत्रांतून विरोध होत असताना गंगापूर तालुक्यातील आसेगाव याथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शाळा वाचविण्याचे साकडे घातले. निमित्त होते ९ ऑक्टोबरच्या जागतिक टपाल दिनाचे. ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं...’ या जुन्या खेळानुसार खरंच हे पत्र काळाच्या ओघात हरवले आहे.
तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यापासून पोस्टकार्डचा वापर जवळपास बंदच झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड, पत्र याविषयीची माहितीच नाही. त्यामुळे जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून आसेगाव जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले. त्या पत्रात, 'साहेब, आपण कमी पोरं असणाऱ्या शाळा बंद करणार आहात. जर या शाळा बंद झाल्या, तर माझ्यासारख्याच त्या शाळांतील मुलांच्या शिकण्याचं काय होईल? म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की, या शाळा बंद करू नका. जर या शाळा बंद झाल्याच तर तिथल्या पोरांना दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागेल. जाताना वाटेत ओढे आहेत आणि त्या ओढ्यातील छातीपर्यंतच्या पाण्यातून कसे जायचे? म्हणून माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे की, या शाळा बंद करू नका,’ असा मजकूर लिहिण्यात आला. त्यातून संवेदनशीलताही जपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती वर्गशिक्षिका गीतांजली साळुंके-हिवाळे यांनी दिली.
‘हरवलेले’ पत्र शोधण्याचा प्रयत्न
भावनांनी ओथंबलेले, ‘हरवलेले’ पत्र शोधण्याचा प्रयत्न वडगाव-कोल्हाटी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केला. मुख्याध्यापक सुनील चिपाटे, हरिश्चंद्र रामटेके, अनिता राठोड, मंगल गाडेकर, विद्या सोनोने, रिता मार्कंडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी पत्र लिहून भावना व्यक्त केल्या.
पत्रलेखन कसे करावे, याचे प्रात्यक्षिक
शहरातील पदमपुरा भागातील महात्मा फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पत्र लेखनाची माहिती दिली. हा उपक्रम मुख्याध्यापक प्रसाद गुंड, कला शिक्षक दिलीप वाढे यांनी राबविला.