एसटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की; संप मिटला, रुजू झाले तरी ना हाताला काम, ना दाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 08:28 PM2022-05-06T20:28:21+5:302022-05-06T20:29:09+5:30

कामच मिळेना, कर्तव्यावर येऊनही बसून राहण्याची, सुटी घेण्याची नामुष्की

Humiliation on ST employees; The strike is over, but no work, no price! | एसटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की; संप मिटला, रुजू झाले तरी ना हाताला काम, ना दाम!

एसटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की; संप मिटला, रुजू झाले तरी ना हाताला काम, ना दाम!

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
एसटीचा संप मिटला असला तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. जिल्ह्यातील अनेक आगारांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही. ‘काम नाही तर दाम नाही’ अशी पद्धत एसटीत असल्याने अनेकांची उपासमार होत आहे. याविषयी कर्मचाऱ्यांतून तीव्र रोष व्यक्त होत आहे.

उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत रुजू होण्याचे आदेश दिले होते. संपकरी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घ्यावी, असे आदेश देण्यात आले. त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, ते २२ तारखेपर्यंत हजर झाले, तर त्यांच्यावरील कारवाई रद्द करण्याची अंमलबजावणी एसटीकडून करण्यात आली. त्यानुसार बहुतांश कर्मचारी अखेरच्या दिवसापर्यंत पुन्हा एकदा रुजू झाले.

तब्बल ५ महिन्यांनंतर लाल परी म्हणजे एसटी पुन्हा एकदा सुसाट धावत आहे. बसस्थानके प्रवासी, बसगाड्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पुन्हा गजबजली आहेत. औरंगाबाद विभागात ५३६ बस आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ४३० बसगाड्या रस्त्यावर धावल्या. आता आगामी काही दिवसांत बसगाड्या आणि फेऱ्या वाढतील. परंतु अनेक आगारांत कर्मचाऱ्यांना कामच मिळत नसल्याने दिवसभर आगारात बसून राहण्याची वेळ येत आहे. एसटी कर्मचारी विजय राठोड म्हणाले, काम मिळत नसल्याने सुटी घ्यावी लागत आहे. यातून सुट्याही कमी होत आहेत. कामावर आले आणि काम नाही मिळाले तरी हजेरी लागली पाहिजे. यासंदर्भात आगारप्रमुखांची भेट घेतली. त्यांनी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अधिक कर्मचारी असलेल्या आगारातील कर्मचाऱ्यांची इतर आगारात बदली करण्याचे नियोजन महामंडळाकडून सुरू आहे.

जिल्ह्यातील एकूण एसटी कर्मचारी- २६७१
- चालक ९०१
-वाहक ७९१

कोणत्या आगारात किती बस ?
सिडको बसस्थानक - ९०
मध्यवर्ती बसस्थानक - १४४
पैठण - ६२
सिल्लोड - ५८
वैजापूर - ५३
कन्नड - ४५
गंगापूर - ४८
सोयगाव - ३६

बसगाड्या वाढविण्यासाठी प्रयत्न
जिल्ह्यातून धावणाऱ्या बसगाड्यांची संख्या ४२५ पर्यंत वाढली आहे. अजून वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या दिवशी कर्मचारी कामावर नसतो, त्या दिवसाचे वेतन दिले जात नाही.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक

कामच नाही
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २० एप्रिल रोजी आगारात हजर झालो. २१ एप्रिल रोजी चालकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्या दिवसापासून आजपर्यंत एकदाही काम मिळालेले नाही.
- ए. सी. सोळंके

फक्त एकदा काम
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दिवसापासून आजपर्यंत एकदाच, २२ एप्रिल रोजी काम मिळाले होते. मला स्पेअरसुद्धा ठेवले नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला काम मिळाले पाहिजे.
- पी. एम. खेडकर

Web Title: Humiliation on ST employees; The strike is over, but no work, no price!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.