‘नम्रतेत देव आहे... नम्र बना, सुखी नव्हे, समाधानी बना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 07:28 PM2018-11-21T19:28:32+5:302018-11-21T19:28:50+5:30
‘नम्रतेत देव आहे. नम्र बना, सुखी नव्हे, समाधानी बना,’ असा मूलमंत्र आज आपल्या खास शैलीतील कीर्तनातून ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी दिला.
औरंगाबाद : ‘नम्रतेत देव आहे. नम्र बना, सुखी नव्हे, समाधानी बना,’ असा मूलमंत्र आज आपल्या खास शैलीतील कीर्तनातून ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी दिला. ‘घालीन लोटांगण... वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन, रूप तुझे’ हा संत नामदेवांचा अभंग त्यांनी कीर्तनासाठी घेतला होता. कारगिल मैदानावर झालेले हे हरिकीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची अफाट गर्दी झाली होती. जणू गर्दीचा हा विक्रमच. महिलांची उपस्थिती तर लक्षणीयच होती.
माजी मंत्री व ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला झालेले इंदोरीकर महाराजांचे कीर्तन म्हणजे त्यांनी सुनावलेले खडे बोल, केलेला उपहास, कडवी टीका, मुली-महिलांना दिलेला कटू उपदेश, युवकांमध्ये निर्माण केलेली आत्मविश्वासाची भावना, समाजातल्या आजच्या व्यंगावर नेमकेपणाने ठेवलेले बोट, योग्य ठिकाणी निर्माण केलेला नर्मविनोद, अंधश्रद्धांवर ओढलेले कोरडे, वेळोवेळी मिळत गेलेल्या टाळ्या व उडालेले हास्याचे फवारे यांचे सुंदर मिश्रणच. गेल्या वीस वर्षांपासून राजेंद्र दर्डा यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन केले जाते, हे यातले आणखी एक वैशिष्ट्य.
महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी राजेंद्र दर्डा यांना बुके व शाल देऊन अभीष्टचिंतन केले, त्याचप्रमाणे महाराजांचाही सत्कार केला. कार्यक्रमाचे संयोजक ‘झुंजार वैष्णवी वारकरी मंडळा’चे जिल्हाध्यक्ष बबनराव डिडोरे पाटील यांनीही इंदोरीकर महाराज व राजेंद्र दर्डा यांचा सत्कार केला.
वादग्रस्त पोस्ट फॉरवर्ड करू नका...
सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणार नाहीत, तर ते कसले इंदोरीकर महाराज. युवकांना त्यांनी खडे बोल सुनावले. आता कायदे पूर्वीपेक्षा अधिक कडक झाले आहेत. पोलीस खातंही कडक झालं आहे. दंगलीच्या भानगडीत पडू नका. त्याचे फार वाईट परिणाम भोगावे लागतात. कोणत्याही परिस्थितीत दंगलीत गुंतू नका. त्यात उतरू नका. आयुष्य बर्बाद होईल. नोकरी मिळणार नाही. लग्नही होणार नाही. गळ्यातील माळ काढून दाखवत महाराज उद्गारले, त्यापेक्षा आमच्या टोळीचे सदस्य व्हा. श्रीमंत होणार नाही; पण समाधानी मात्र नक्की व्हाल. (टाळ्या)आजचा जमाना व्हॉटस्अॅप व फेसबुकचा आहे. बहुतांश मंडळी त्यातच गुंगलेली असते. वादग्रस्त पोस्ट टाकण्याचं प्रमाणही वाढत चाललंय. अशावेळी अशी पोस्ट डिलिट करा, फॉरवर्ड करू नका, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
जी गोष्ट आवडते, ती मनापासून करा, लक्ष्मी तुमच्याकडे येईल. छोट्या-मोठ्या उद्योगांकडे वळा. छोट्याशा हातगाडीवर पाणीपुरी विकणारे व खारी-शेंगदाणे विकणाऱ्यांचा आदर्श घ्या, असा सल्ला महाराजांनी युवावर्गाला दिला. आजकालच्या युवकांमध्ये आत्मविश्वास कमी होत चालल्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. त्यांनी याप्रसंगी युवकांना व्यसनमुक्त राहण्याचा हितोपदेश केला. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या गुणांमुळे मुली सर्वच क्षेत्रे यशस्वीपणे पादाक्रांत करीत आहेत, असे नमूद करीत महाराजांनी सल्ला दिला की, आता आई-वडिलांवर कथा, कविता, कादंबऱ्या व चित्रपट करणी पुरे. त्यांना फक्त हसते ठेवा.
डिजिटल शाळा
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी आज कीर्तनात त्यांच्यावरील आक्षेपांचेही खंडन केले. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. खरे तेच बोलतो, हा माझा अवगुण. महिन्यातून ९० कीर्तने करतो. एका दिवसात पाच वेळा कीर्तन करण्याचीही क्षमता आहे. त्यातून मिळालेल्या मानधनातून मी पाचवी ते दहावीपर्यंतची डिजिटल शाळा उभी केली आहे. येऊन बघा (टाळ्या). कीर्तनात त्यांनी पुढाऱ्यांच्या वैशिष्ट्यांची व कार्यकर्त्यांच्या निसटा-निसटीचे वर्णन खुमासदार पद्धतीने भाविकांची हसून-हसून पुरेवाट केली.
इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाआधी ह.भ.प. प्रभाकर महाराज कुटे यांची भारुडे रंगली, तर ज्योती तोटेवार यांचा ‘झिंगराबाई’ विनोदी वºहाडी ठसक्याचा कार्यक्रम झाला. रमेश दिसागज व विजय दिसागज यांनी सूत्रसंचालन केले. मंचावर आ. सुभाष झांबड, पंकज फुलपगर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. काशीनाथ जाधव, भानुदास जाधव, वामनराव वळेकर, गणेश डिडोरे, अजय दिसागज, अजय डिडोरे, अनिल खंबाट, बाळासाहेब मुठाळ, साहेबराव म्हस्के, प्रभाकर डिडोरे, सुनील त्रिभुवन, संजय दळवी, नारायण पारटकर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या टीमने या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
दर्डाजींना सामाजिक तळमळ... प्रेम
राजेंद्रबाबूंना इंदोरीकर महाराजांनी मनापासून आशीर्वाद दिले. कीर्तन सुरू करण्याच्या आधीच भलामोठा पुष्पहार स्वत: इंदोरीकर महाराजांनी राजेंद्र दर्डा यांच्या गळ्यात घातला. एवढेच नाही तर स्वत:च्या हाताने पेढा भरवून त्यांचे तोंड गोड केले. कीर्तनात त्यांनी वेळोवेळी त्यांचा उल्लेख केला. महाराज म्हणाले की, खरं तर दर्डा साहेबांना राजकारणाची गरज नाही; पण समाजाबद्दलची तळमळ, प्रेम आणि विकासाबद्दलचा ध्यास यामुळं ते राजकारणात आहेत. (टाळ्या)
मरायची नोकरी, त्याला पगार कमी...
पोलिसांना एक लाख रुपये पगार असायला पाहिजे, अशी मागणी करीत इंदोरीकर महाराजांनी एसटी कंडक्टर, वायरमन आणि पोलिसांचे काम हे किती जोखमीचे असते, याकडे लक्ष वेधले आणि ज्यांची मरायची नोकरी आहे, त्यांना कमी पगार! आणि शिक्षकाला धक्काही लागत नाही, त्याला ८२ हजार रुपये पगार! वारे न्याय... असे ते म्हणाले.