औरंगाबादेत शंभर वर्षांपूर्वीची इमारत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:14 AM2018-07-28T00:14:12+5:302018-07-28T00:18:22+5:30
बेगमपुरा भागातील थत्ते हौद येथील शंभर वर्षे जुनी इमारत शुक्रवारी पहाटे ५ वाजता अचानक कोसळली. शेजारील एका घरावर तीन मजली इमारतीचा मलबा कोसळला. मध्यरात्री मोठ्या इमारतीमधून आवाज येत असल्याने तीन कुटुंबियांनी सामानासह घर सोडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बेगमपुरा भागातील थत्ते हौद येथील शंभर वर्षे जुनी इमारत शुक्रवारी पहाटे ५ वाजता अचानक कोसळली. शेजारील एका घरावर तीन मजली इमारतीचा मलबा कोसळला. मध्यरात्री मोठ्या इमारतीमधून आवाज येत असल्याने तीन कुटुंबियांनी सामानासह घर सोडले होते. शेजारील ज्या घरावर इमारत कोसळण्याचा अंदाज होता ते घरही रिकामे करण्यात आले होते. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मनपाच्या अग्निशमन, अतिक्रमण हटाव विभागाने मलबा दूर केला.
बेगमपुऱ्यातील गणपती मंदिरासमोर अरुण परदेशी आणि कैलास परदेशी यांचे दुमजली घर आहे. या घराला लागूनच माधवराव राऊत यांनी १९९१ मध्ये दुमजली जुने घर खरेदी केले होते. त्यांची मुले अशोक, कृष्ण आणि नीलेश यांनी दुमजली इमरतीवर आणखी एक मजली बांधकाम केले. १०० वर्षे जुन्या तळमजल्याची क्षमताही राऊत कुटुंबियांनी तपासली नाही. तळमजल्यावर एक किराणा दुकानही थाटण्यात आले होते. शुक्रवारी रात्री १० वाजेपासून तळमजल्यावरील इमारतीवर प्रचंड ताण येऊ लागल्याने आवाज येऊ लागला. इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते याचा अंदाज राऊत कुटुंबियांना आला. त्यांनी इमारत रिकामी केली. इमारतीत दोन गरीब भाडेकरूही होते. त्यांनीही सामानासह घर सोडले. पहाटे पाच वाजता इमारत पत्त्यासारखी अरुण परदेशी आणि कैलास परदेशी यांच्या दुमजली घरावर कोसळली. परदेशी यांनीही घर रिकामे केले होते. त्यामुळे दोन्ही इमारतीमधील रहिवाशांना दुखापत झाली नाही. इमारत कोसळण्याचा आवाज होताच आजूबाजूचे रहिवासी झोपेतून खडबडून जागे झाले व मुलाबाळांसह बाहेर पडले. इमारत कोसळल्याने सर्वत्र मातीचे लोट पसरले होते. वीजपुरवठा खंडित झाला होता. इमारतीमध्ये कोणी अडकले तर नसेल, असे प्रत्येकाला वाटत होते. काही वेळेनंतर सर्व सुखरूप असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक सचिन खैरे, माजी नगरसेवक गणू पांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मदतीला धावले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्वरित अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठविले. काही वेळेनंतर अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने मलबा दूर करण्यात आला.
शेजारच्या घराचे मोठे नुकसान
राऊत यांची तीन मजली इमारत परदेशी कुटुंबाच्या घरावर कोसळली. हे कटुंब अगोदरच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. दोन भाऊ दुमजलीत राहत होते. कै लासच्या पत्नीने घरातच ब्युटीपार्लरचा व्यवसाय सुरू केला होता, तर अरुण हा कुल्फी, तर कधी पाणीपुरीच्या गाडीवर उदरनिर्वाह करतो. या घटनेने परदेशी कुटुंब रस्त्यावर आले. त्यांना त्वरित एका भाड्याच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली आहे. शनिवारी त्यांना आर्थिक मदतही करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक गणू पांडे यांनी सांगितले.