शेकडो बालकांना जन्मजात व्यंगातून मिळणार मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 03:53 PM2018-12-14T15:53:18+5:302018-12-14T16:00:10+5:30

आपण व्यंगमुक्त होणार या आनंदाने रुग्ण व त्यांच्या पालकांना आभाळ ठेंगणे झाले होते.

Hundreds of children will get relief from birth defect | शेकडो बालकांना जन्मजात व्यंगातून मिळणार मुक्ती

शेकडो बालकांना जन्मजात व्यंगातून मिळणार मुक्ती

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टरांच्या होकाराने पालक आनंदितलायन्स प्लास्टिक सर्जरी शिबिराला सुरुवात

औरंगाबाद : जन्मजात व्यंग घेऊन जगणाऱ्या रुग्णांची अमेरिकेतील डॉ. राज लाला यांनी तपासणी केली व शस्त्रक्रियेला होकार दिला. आपण व्यंगमुक्त होणार या आनंदाने रुग्ण व त्यांच्या पालकांना आभाळ ठेंगणे झाले होते. अनेकांनी लगेच मोबाईलवरून ही आनंदवार्ता आपल्या नातेवाईक व मित्रांना कळविली. हा क्षण याचि देही याचि डोळा अनुभवणाऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. 

प्रसंग होता, लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा. गुरुवारी (दि.१३) सिडको एन-१ येथील लायन्स आय हॉस्पिटलसमोर मंडपात सकाळी ७ वाजेपासूनच हजारो रुग्ण व त्यांचे पालक येऊन बसले होते. रुग्णांत बालकांचा समावेश अधिक होता. काही बालक तर एक वर्षाआतील होते. कोणाचे ओठ दुभंगलेले होते. कोणाच्या चेहऱ्यावर व्रण व डाग होते. कोणाच्या डोळ्यावरील पापणी पडलेली होती, तर काही जणांच्या नाकावर बाह्य विकृती होती. यात बालकांचे प्रमाण अधिक होते. चेहऱ्यावरील व्यंगामुळे  लग्न जमण्यास अडचणीचे ठरणारे विवाहोच्छुक तरुण-तरुणींही येथे दिसून आले.

यावेळेस शिबिरात ० ते १० वयोगट, ११ ते २० व २१ वर्षाच्या पुढील रुग्ण अशा तीन रांगा करण्यात आल्या होत्या. प्रत्येकाला नंबर देऊन त्यानुसारच हॉस्पिटलमध्ये सोडण्यात येत होते. अमेरिकेतील डॉ. राज लाला, डॉ. संजय लाला, डॉ. ओम अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करीत होते. ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया तात्काळ शक्य आहे त्यांना लगेच डॉक्टर होकार देत होते. होकार मिळताच रुग्ण व त्यांचे पालक आनंदित होत होते. सिल्लोड तालुक्यातील शेतकरी विजय वाघमारे यांच्या एक वर्षाच्या मुलीचे ओठ दुभंगलेले असल्याने तिला सहज दूध पिता येत नव्हते.

डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी करण्यास होकार दिल्याने आता मुलीला दूध पिता येईल, तिचे व्यंग गायब होईल, या विचाराने वाघमारे पती-पत्नी आनंदित झाले होते. त्यांनी लगेच गावाकडे आपल्या नातेवाईकांना व मित्रांना फोन करून याची माहिती दिली. सुष्मिता (नाव काल्पनिक) नावाची तरुणी येथे आली होती. चेहऱ्यावर काळा डाग असल्याने तिचे लग्न जमत नव्हते. तीसुद्धा मोठ्या आशेने रांगेत उभी होती. तिच्या सारखाच चेहऱ्यावर काळा डाग असलेल्या काही तरुणी व तरुण रांगेत उभे होते. प्रत्येकाला आशा होती की, डॉक्टर तपासून होकार देतील व पुढील चार दिवसांत प्लास्टिक सर्जरी होऊन काळा डाग नाहीसा होईल. या तरुण-तरुणीसोबत त्यांचे मित्र-मैत्रिणी आले होते. 

पुढील ४ दिवसांत ५१० रुग्णांवर होणार प्लास्टिक सर्जरी 
मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराच्या पहिल्या दिवशी डॉ. राज लाला यांनी ७८० रुग्णांची तपासणी केली. त्यातील ५१० रुग्णांची प्लास्टिक सर्जरीसाठी निवड करण्यात आली. आता निवड झालेल्या रुग्णांवर १४ ते १७ डिसेंबरदरम्यान एमजीएम हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सर्व रुग्णांना त्यांचा नंबर व शस्त्रक्रियेची तारीख देण्यात आल्याची माहिती प्रकल्पप्रमुख राजेश लहुरीकर यांनी दिली. 

अमेरिकेतून भारतात येतो ‘माणुसकी’च्या सेवेसाठी  
रुग्णांच्या चेहऱ्यावरील व्यंग दूर होऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलावे, हीच एक नि:स्वार्थ भावना मनाशी बाळगून लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणा मागील ४२ वर्षांपासून मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर आयोजित करीत आहे. हे शिबीर म्हणजे ‘माणुसकीची सेवा’ होय. यासाठी १९ वर्षांपासून मी खास अमेरिकेतून भारतात येत आहे. येथील रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्यावर व त्यांचे समाधानी चेहरे पाहिल्यावर आत्मसमाधान मिळते, अशा शब्दात डॉ. राज लाला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ आयोजित प्लास्टिक सर्जरी शिबिरात ते बोलत होते. प्रारंभी, उद्योजक उमेश दाशरथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर एमजीएमचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी, औरंगाबाद ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर, लायन्सचे इंटरनॅशनलचे डायरेक्टर डॉ. नवल मालू, मल्टिपल कौन्सिल चेअरमन संदीप मालू, डॉ. संजय लाला, डॉ. ओम अग्रवाल, डॉ. ललिता लाला, डॉ. मालती दमानी तसेच विवेक अभ्यंकर, पीएमसीएसचे एम. के. अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. लायन्सचे अध्यक्ष सुरेश साकला यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मनोहर अग्रवाल यांनी आभार मानले.

लायन्स क्लब सिटीतर्फे अन्नदान 
लायन्सच्या प्लास्टिक सर्जरी शिबिरासाठी जिल्हा तसेच परजिल्ह्यातून आलेले गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद सिटीतर्फे झुणका-भाकर देण्यात आले. अध्यक्ष चेतन अग्रवाल व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: Hundreds of children will get relief from birth defect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.