शेकडो अतिक्रमणांनी घोटला औरंगाबाद शहरातील नाल्याचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:56 PM2018-06-22T23:56:42+5:302018-06-22T23:58:58+5:30

जयभवानीनगरात नालीवर ढापे किंवा लोखंडी जाळी न टाकल्याचा निष्काळजीपणा मनपाने केला. तसेच नाल्यावर झालेली अतिक्रमणे आणि अनेक ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून नाल्याचा गळा घोटण्यात आल्याने मंगळवारी रात्री उघड्या नाल्यात पडून भगवान मोरे यांचा जीव गेला.

Hundreds of encroachments hit the nala in Aurangabad city | शेकडो अतिक्रमणांनी घोटला औरंगाबाद शहरातील नाल्याचा गळा

शेकडो अतिक्रमणांनी घोटला औरंगाबाद शहरातील नाल्याचा गळा

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाचा हलगर्जीपणा : सिमेंट पाईप टाकल्याने एन-३ ते जयभवानीनगरात नाला झाला अरुंद; आता प्रशासन हतबल

प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जयभवानीनगरात नालीवर ढापे किंवा लोखंडी जाळी न टाकल्याचा निष्काळजीपणा मनपाने केला. तसेच नाल्यावर झालेली अतिक्रमणे आणि अनेक ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून नाल्याचा गळा घोटण्यात आल्याने मंगळवारी रात्री उघड्या नाल्यात पडून भगवान मोरे यांचा जीव गेला.
जयभवानीनगरातील घटनेने पुन्हा एकदा शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आमच्या प्रतिनिधीने गुरुवारी सिडको एन-३, एन-४ व जयभवानीनगरपर्यंतच्या नाल्याची परिक्रमा केली. त्यात अनेक ठिकाणी नाल्याचा गळा घोटण्यात आल्याचे दिसले. वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळून या नाल्याचा उगम होतो तो जालना रोड खालून पुढे एन-३ मध्ये जातो. सिमेंटचे दोन पाईप टाकून त्यातून नाल्याचे पाणी पुढे काढण्यात आले. एन-३, वॉर्ड नं. ७२ येथील सद्गुरूकृपा मल्टी सर्व्हिसेसच्या समोर वाहणारा नाला भूमिगत पाईपलाईन टाकण्यात आल्याने बुजविण्यात आला. पुढे टॉडलर नर्सरीमधूनही नाल्यावर सिमेंटचे ढापे टाकून बंदिस्त केला आहे. पुढे हा नाला थेट १९९-बी-३ प्लॉटवरील इमारतीच्या बाजूलाच मोकळा दिसतो. केटली गार्डनच्या पश्चिम-दक्षिण कोपऱ्यातून हा नाला पुढे गेला आहे. येथे नाल्यावर सिमेंटचे ढापे टाकण्यात आले आहे; पण कॉर्नरवर नाला उघडा आहे. पुढे नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे नाला दिसतच नाही. थेट एन-४ येथील संकटमोचन वीर हनुमान मंडळाच्या रस्त्यावर डाव्या बाजूने नाला दृष्टीस पडतो. येथे त्याच्यावर सिमेंटचे ढापे बसविण्यात आले. मंदिराच्या तेथून नाला एमआयटी कॉलेजच्या पूर्व बाजूला वाहतो. येथे नाल्याची खोली ७ ते १० फुटांपर्यंत करण्यात आली आहे. नाल्याचा एवढा भाग मोकळा आहे. मात्र, पुन्हा बी-७ एच प्लॉटच्या समोरील बाजूस पुलाखालून नाला पुढे गेला. येथे नाल्यावर काँक्रीट स्लॅब टाकला आहे. मात्र, विजय लताड यांच्या बंगल्याच्या बाजूला नाल्याचे अस्तित्व दिसून येते. येथेही उघड्या नाल्यावर लोखंडी जाळी टाकण्याची आवश्यकता आहे.
येथे ९०० एम.एम.व्यासाचे पाईप टाकण्यात आले आहे. पाऊस पडताना वाहत्या पाण्याची ताकद पाहता येथे १२०० एम.एम.व्यासाची पाईपलाईन आवश्यक होती. पाईप अरुंद असल्याने नाल्यातून जोरात पाणी आल्यावर ते पुन्हा मागे फेकले जाते. येथील प्रभाकर वाघ यांच्या बंगल्याच्या दक्षिण बाजूने उघडा नाला दिसून येतो. याच भागातील ड्रेनेजचे पाणी याच नाल्यात सोडण्यात आले आहे. सर्व दुर्गंधीयुक्त पाणी लताड व वाघ यांच्या बंगल्यात शिरते. पुढे या नाल्याची दिशाच बदलून टाकण्यात आल्याचे निदर्शनात आले. पुढे हाच नाला कृष्णराज मंगल कार्यालयाच्या बाजूने एन-४ मधून जयभवानीनगरात पोहोचतो. याच उघड्या नाल्यावर जयभवानीनगरात अतिक्रमण करून इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. हरी बॅग हाऊस दुकानासमोर उघड्या नाल्यात मंगळवारी रात्री भगवान मोरे पडले व त्यांचा मृत्यू झाला. पुढे सर्वत्र नाल्यावर अतिक्रमण करून नाल्याची दिशाच वळविण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून या परिसरात मनपाने अतिक्रमण पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
अनेकांचे नाल्यावरील घरे पाडण्यात आल्याने आता नाला दिसतो; पण येथे सध्या भूमिगत गटारीचे काम सुरूआहे. नंतर हा नाला मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनच्या पुढे निघतो.
एन-३ ते जयभवानीनगरदरम्यान काही ठिकाणी नाला उघडा आहे; पण काही ठिकाणी नाल्यात सिमेंटचे पाईप टाकल्याने नाला बंदिस्त झाला आहे. त्यात याच नाल्यावर काही ठिकाणी अतिक्रमण करून इमारती बांधल्या आहेत. यामुळे अधूनमधून नाला गायब होतो. जयभवानीनगरात तर नाल्यावर मोठे अतिक्रमण केले, नाल्याची दिशा बदलण्यात आली आहे. नैसर्गिक प्रवाहाला जागोजागी अडविण्यात आल्याने येथे थोड्या पावसाने नाले, ड्रेनेजलाईन भरून जातात व रस्त्यावर पाणी साठते. त्यात नाल्यावर जाळ्या नसल्याने दुर्घटना घडते.

Web Title: Hundreds of encroachments hit the nala in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.