पैठणरोडवर उभ्या राहणाऱ्या शेकडो ट्रकमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 06:19 PM2024-12-06T18:19:41+5:302024-12-06T18:20:08+5:30
पोलिसांचे दुर्लक्ष : शहरात प्रवेश करण्यासाठी शेकडो जडवाहनांच्या लागतात रांगा
छत्रपती संभाजीनगर : जड वाहनांना रात्री नऊपर्यंत शहरात नो एंट्री आहे. असे असताना शहरात प्रवेश करण्यासाठी पैठण आणि लिंक रोडने येणाऱ्या शेकडो मालवाहतूक ट्रक रोज सायंकाळी महानुभाव आश्रम चौकापर्यंत येऊन थांबतात. या ट्रकमुळे रस्ता एकेरी होतो आणि शहरात येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एवढेच नव्हे, तर एकेरी रस्त्यामुळे तेथे अपघाताचीही शक्यता वर्तविली जाते, याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
शहरातील अपघात टाळण्यासाठी जड वाहनांना सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत प्रवेश मनाई करण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांचे आहेत. असे असताना मालवाहू वाहतूक करणारे ट्रकसह अन्य जडवाहनांचे चालक मनमानी करीत असल्याचे दिसून येते. शहरात रात्री नऊ वाजल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे, हे माहिती असूनही पैठण लिंकरोड आणि बिडकीनकडून येणारे शेकडो मालवाहू ट्रक रोज सायंकाळी महानुभाव आश्रम वाहतूक सिग्नलपर्यंत येऊन उभे राहतात. एकापाठोपाठ उभ्या राहणाऱ्या या ट्रकची रांग गुरूवारी लिंक रोडपर्यंत लागलेली होती.
या मार्गावरून सायंकाळी बिडकीन डीएमआयसीतील शेकडो कामगार, तसेच वाळूज एमआयडीसीतून कामगारांची ने-आण करणाऱ्या शेकडो बसेस आणि अन्य वाहने धावतात. पैठण, गंगापूर तालुक्यातील ग्रामीण भागात नोकरीचे ठिकाणहून शहरात अप-डाऊन करणारे नोकरदारही याच मार्गाने सायंकाळी शहरात येतात. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या या ट्रकमुळे हा दुहेरी मार्ग एकेरी बनतो. परिणामी तेथे वाहतूक कोंडी होते. बऱ्याचदा रुग्णवाहिकाही या वाहतूक कोंडीत अडकून पडते. या वाहनांना रात्री नऊ वाजल्यानंतर शहरात प्रवेश मिळणार असतो, यामुळे त्यांना लिंकरोडच्या पुढे शहरात का येऊ दिल्या जाते, असा प्रश्न यानिमित्ताने वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
कारवाई करण्यात आली
जडवाहनांना बायपासवर जाण्यास परवानगी आहे. मात्र, शहरात रात्री नऊपर्यंत प्रवेश नसतो. आज तेथे येऊन थांबलेली जड वाहनांमध्ये मका घेऊन रेल्वे मालधक्का येथे जायचे होते. यामुळे ही ट्रक महानुभाव आश्रम सिग्नलपर्यंत येऊन थांबली होती. रेल्वे येणार नसल्याचे त्यांना समजल्याने काही ट्रकचालक तेथून निघून गेले. उर्वरित ट्रकचालकांनाही आम्ही तेथून जाण्यास सांगितले आहे.
-- विवेक जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग.