बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 06:42 PM2022-10-04T18:42:14+5:302022-10-04T18:42:58+5:30
सिल्लोडमधून तब्बल ५०० वाहनातून २५ हजार कार्यकर्ते बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गेल्याचा दावा
सिल्लोड (औरंगाबाद): सिल्लोड तालुक्यातून शेकडो एसटी आणि खाजगी बसेस आज सकाळी ११ वाजेपासून टप्याटप्याने मुंबईला मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी रवाना झाल्या. यामुळे जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलीस आणि स्वयंसेवकांनी वाहतूक सुरळीत केली.
आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी सिल्लोड येथील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयात गर्दी केली होती. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून एसटी आणि खाजगी बससह इतर लहान मोठ्या वाहनातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. मंत्री सत्तार यांच्या सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातून तब्बल ५०० वाहनातून २५ हजार कार्यकर्ते बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गेल्याचा दावा करण्यात येत आहे.
प्रत्येक गाडीत चहा, जेवणाची सोय
सिल्लोड येथून तब्बल २५ हजार कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मी देखील मुंबईला रवाना होत आहे. प्रत्येक गाडीत चहा, नाष्ट्याची सोय आहे. मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथेच फिरत्या स्वच्छता गृहाची व्यवस्था आहे.
- अब्दुल सत्तार, कृषीमंत्री