बदल्यांमध्ये शेकडो शिक्षक विस्थापित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:18 AM2018-05-30T00:18:27+5:302018-05-30T00:19:33+5:30

जिल्ह्यातील ५२७ शिक्षक विस्थापित झाले असून, यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील तब्बल १७३ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांनी मागितलेल्या २० पैकी एकाही शाळेवर त्यांची बदली झाली नाही. उलट त्यांच्या जागेवर दुसरे शिक्षक बदलीने येणार असल्यामुळे या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Hundreds of teachers displaced in transfers | बदल्यांमध्ये शेकडो शिक्षक विस्थापित

बदल्यांमध्ये शेकडो शिक्षक विस्थापित

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद : अनेक पती-पत्नी शिक्षकांची ताटातूट; नाराजीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ५७५ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमार्फत वाटप करण्यात आले. कालपासून आपली बदली कुठे झाली, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शिक्षकांनी सकाळपासूनच गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. दरम्यान, जिल्ह्यातील ५२७ शिक्षक विस्थापित झाले असून, यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील तब्बल १७३ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांनी मागितलेल्या २० पैकी एकाही शाळेवर त्यांची बदली झाली नाही. उलट त्यांच्या जागेवर दुसरे शिक्षक बदलीने येणार असल्यामुळे या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या ई-मेलवर जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांच्या बदलीचे आदेश आले; परंतु त्या बाहेरगावी असल्यामुळे शिक्षण विभागाला बदली आदेशास त्यांची मान्यता घेता आली नव्हती. त्यामुळे काल शिक्षकांना बदली आदेश बजाविण्यात आले नव्हते. पवनीत कौर या सोमवारी रात्री औरंगाबादेत आल्या. शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी मंगळवारी सकाळीच शिक्षकांच्या बदली आदेशावर त्यांची स्वाक्षरी घेतली व तात्काळ सर्व नऊ गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षकांचे बदली आदेश सुपूर्द केले. शिक्षकांनीही गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये बदलीचे आदेश मिळविण्यासाठी गर्दी केली होती.
शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये आॅनलाईन बदली प्रक्रियेत कनिष्ठांनी वरिष्ठांना खो देणे, नियमानुसार २० शाळांचे पर्याय दिलेले असतानादेखील एकही शाळा न मिळणे, पती-पत्नी एकत्रीकरणाऐवजी ३० कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होणे, पती-पत्नीपैकी एकाला बदली मिळाली आणि दुसºयास विस्थापित व्हावे लागले. पती-पत्नी दोघेही विस्थापित होणे, ५३ वर्षांवरील शिक्षकांना बदली न मिळणे, अशा अनेक प्रकारे शिक्षकांवर अन्याय झाल्याची चर्चा मंगळवारी औरंगपुºयातील जि.प. कन्या प्रशालेत बदली आदेश वितरण केंद्राच्या ठिकाणी ऐकायला मिळाली.
दरम्यान, विस्थापित शिक्षकांसाठी ३१ मेपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुभा बदलीच्या राज्यस्तरीय कक्षाने दिली आहे. या शिक्षकांना नव्याने २० शाळांचे पर्याय नोंदवावे लागतील.
दिलेल्या पर्यायांपैकी पुन्हा शाळा मिळाली नाही, तर त्यांना मग, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी निर्देशित केलेल्या शाळेवर रुजू व्हावे लागणार आहे.

Web Title: Hundreds of teachers displaced in transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.