गोडाऊन फोडून लाखोचा माल पळविणारी टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 07:16 PM2018-04-25T19:16:56+5:302018-04-25T19:17:56+5:30
आठ दिवसांपूर्वी शेकटा येथील एका व्यापाऱ्याचे गोडाऊन फोडून सुमारे २७ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.
औरंगाबाद : आठ दिवसांपूर्वी शेकटा येथील एका व्यापाऱ्याचे गोडाऊन फोडून सुमारे २७ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. गोडाऊनमधील चोरलेल्या मालापैकी सुमारे ४ लाखांचा माल आणि टेम्पो पोलिसांनी जप्त केला. शेख नासेर शेख अब्दुल (३२, रा.कागजीपुरा), अमरसिंग मठल्लूसिंग मौर्य (२८, मूळ रा. शकरदहा, ता.कुडा, जि.प्रातपगड, उत्तर प्रदेश, ह.मु. वडगाव कोल्हाटी) आणि मोहंमद आमेर गुलाम साबेर (३२, रा.दुखीनगर कदीम जालना), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार मंजूर पिंजारी (रा. नाचनवेल, ता.कन्नड), चंद्रकांत रामचंद्र शनोरे (४३, रा.गाडेमळा, सिन्नर, जि.नाशिक) अन्य दोन जण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग म्हणाले की, १७ एप्रिलला रात्री चोरट्यांनी शेकटा येथील किराणा दुकानदार प्रवीण संजय झवर यांचे गोडावून फोडून सुमारे २७ लाखांचा माल चोरून नेला होता. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असताना उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत यांना खबऱ्याने कळविले की, ही चोरी नाचनवेल येथील मंजूर पिंजारी टोळीने केली. तो फरार असल्याचे पोलिसांना समजले. तपासाअंती पोलिसांनी शेख नासेर याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही चोरी मंजूर पिंजारी, चंद्रकांत शनोरे, अमरसिंग मौर्य आणि अन्य दोन जणांनी केल्याचे सांगितले. शेकटा येथील गोडावूनमधून लुटलेला माल नाशिक, जालना आणि वडगाव कोल्हाटी येथे विक्री केल्याची कबुली दिली.
त्यावरून पोलिसांनी चोरीचा माल विकत घेणारा जालना येथील मोहंमद आमेर यास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून तंबाखूची २५ पोती, तर आरोपी अमरसिंग याच्या वडगाव कोल्हाटी येथील घरातून बिस्किट पुडे, शाम्पू डबे आणि अन्य सामान, असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला. शिवाय चोरीचा माल वाहतूक करण्यासाठी आरोपींनी वापरलेला टेम्पो हस्तगत केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भुजंग, उपनिरीक्षक दुलत, गणेश जाधव, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, संजय काळे, बाळू पाथ्रीकर, विठ्ठल राख, सुनील शिराळे, राहुल पगारे, सागर पाटील यांनी केली.