शेकडो बेवारस मृतदेह पाण्याबाहेर काढणारा ‘शनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:28 AM2018-02-11T00:28:29+5:302018-02-11T00:29:20+5:30

पैठणच्या गोदावरी पात्रात व नाथसागरात बुडून मरण पावलेल्या बेवारस मृतदेहांना पाण्याबाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे कठीण व तितकेच नकोसे असलेले अप्रिय काम अत्यंत श्रध्देने करणारा पैठण शहरातील अनाथ सुधाकर ऊर्फ शनीने गेल्या ३५ वर्षांत ४०० पेक्षा जास्त बेवारस मृतदेहांना बाहेर काढून अंत्यसंस्कार विधी पार पाडले आहेत. अत्यंत अप्रिय व कठीण काम करताना शनिला पैसा अडक्याची अपेक्षा नसते.

 Hundreds of unemployed dead bodies 'Shani' | शेकडो बेवारस मृतदेह पाण्याबाहेर काढणारा ‘शनी’

शेकडो बेवारस मृतदेह पाण्याबाहेर काढणारा ‘शनी’

googlenewsNext

संजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठणच्या गोदावरी पात्रात व नाथसागरात बुडून मरण पावलेल्या बेवारस मृतदेहांना पाण्याबाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे कठीण व तितकेच नकोसे असलेले अप्रिय काम अत्यंत श्रध्देने करणारा पैठण शहरातील अनाथ सुधाकर ऊर्फ शनीने गेल्या ३५ वर्षांत ४०० पेक्षा जास्त बेवारस मृतदेहांना बाहेर काढून अंत्यसंस्कार विधी पार पाडले आहेत. अत्यंत अप्रिय व कठीण काम करताना शनिला पैसा अडक्याची अपेक्षा नसते.
‘पुण्याचे काम’ हीच त्याची या कामाची व्याख्या. शनीला राहायला घर नाही, जगात त्याचे रक्ताचे नातेसंबंध आहेत का नाही हेही तो सांगत नाही. आपल्या कठीण कामाने मात्र त्याने पैठण शहरात स्वत:चे अस्तित्व तयार केले आहे. पोलिसांना शनीची मदत होत असल्याने पोलिसांचा त्याला आधार असतो. रात्री शहर झोपल्यावर एखाद्या दुकानाच्या ओट्यावर रात्र काढायची, सकाळी गंगेत स्नान करून दुसºया दिवसाची सुरुवात करायची. हाच शनीचा दिनक्रम.
३५ वर्षांपूर्वी पैठण शहरात कामधंद्याच्या शोधात जालना जिल्ह्यातून आलेल्या सुधाकर शामराव सोमते याच्या पदरात पैठण शहरात परिस्थितीने हे नकोसे काम टाकले. पाण्यात बुडून मृत झालेले, सडलेले मृतदेह, दुर्गंधी फेकणारे मृतदेह काहीही कानकुस न करता तो बाहेर काढतो, पाण्यात बुडालेल्या मृतदेहाचा शोध घेतो. कधी कधी काम झाल्यावर लोक निघून जातात, कुणी त्याचा हात हातात घेऊन आभार मानत नाहीत की साधे धन्यवाद सुध्दा देत नाही. अगदी घटनास्थळावरून त्याला पायी घरी परतावे लागते. याचेही दु:ख त्याने मानले नाही.
बेवारस मृतदेहांवर अग्निसंस्कार
बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शनी शहरातून निधी जमा करतो. पांढरे वस्र, अगरबत्ती, अत्तर, फुले आदी साहित्य विकत घेऊन तो मृतदेहास अग्नी देतो. यात दोन पैसे जास्तीचे कधी त्याने घेतले असेही समोर आले नाही.
काम झाल्यावर पोलीस १०० रुपये देतात. कुणी शर्ट, पँट देतो, कुणी जेवण देतो, माझ्या कामामुळे मला लोक ओळखतात हीच त्याला त्याची मिळकत वाटते. काम करण्यासाठी पैशाचा मोबदला मागून त्याने कधी अडवणूक केली नाही. अशा या अवलियास घर-दार द्यावे, त्याच्यासाठी काहीतरी करावे असे समाजाला आजही वाटत नाही. गरज पडल्यावर मात्र शनीची सर्वांनाच आठवण येते आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता शनी तथास्तू म्हणत तेथे हजर होतो.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने शनीचा दिवसभर शोध घेतल्यानंतर शनी गंभीर आजारी असून तो औरंगाबाद येथे शासकीय रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती हाती आली आहे. शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांना शनीबाबत माहिती दिल्यानंतर शनीच्या उपचाराची जबाबदारी रवींद्र काळे यांनी घेतली आहे.
मोक्षतीर्थ पैठण
पैठण शहराला गोदावरीच्या पात्राने विळखा घातला आहे. शहराच्या माथ्यावरच जायकवाडी धरण आहे. पैठण शहर मोक्षतीर्थ म्हणून ओळखले जात असल्याने येथे दररोज शेकडो दशक्रिया विधी पार पडतात. विधीसाठी गोदाकाठावर खचाखच गर्दी असते. यामुळे गोदावरीत बुडून मरण पावण्याच्या घटना वारंवार घडतात. मोक्षतीर्थ असल्याने जीवनाला कंटाळलेले अनेक जण गोदावरीत वा नाथसागरात येऊन आत्महत्या करतात. अशा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पोलिसांवर येते. घटना घडल्यानंतर पोलीस शनीचा शोध घेतात व पुढील कार्य शनी विनातक्रार पार पाडतो.
'शनी' उपचारासाठी रूग्णालयात
अनाथ बेघर असलेल्या सुधाकर ऊर्फ 'शनी'चे आता वय झाले आहे. साठीच्या घरात असलेला शनी गेल्या काही दिवसांपासून शहरात दिसेनासा झाला आहे.
च्एरवी पाण्यात मृतदेह आढळल्याची खबर मिळताच सर्वांना त्याची आठवण होते. मग त्याचा शोध घेणारे पोलीस व नागरिक त्याला हुडकून काढतात. काम झाल्यावर थोडीफार बिदागी त्याच्या हातावर टेकवून निघून जातात. समाजाच्या दृष्टीने बेदखल दुर्लक्षित असलेले हे व्यक्तीमत्व शहरातून गेल्या आठ दिवसांपासून गायब आहे, याचे कुणाला काय?
मृतदेहाची दुरवस्था झालेली असल्यास कधी कधी आहे त्या ठिकाणी शवविच्छेदन करावे लागते. अशावेळी दुर्गंधीमुळे कुणी थांबत नाही तेथे सुधाकर उर्फ शनीची मदत घेऊनच शवविच्छेदन करण्यात येते.

Web Title:  Hundreds of unemployed dead bodies 'Shani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.