औरंगाबादेत टँकरची शंभरी
By Admin | Published: May 14, 2014 12:24 AM2014-05-14T00:24:05+5:302014-05-14T00:28:56+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता मे महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता मे महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील पावणेदोनशे गावांना सध्या पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करणार्या टँकरची संख्या १०० वर पोहोचली आहे. टंचाईग्रस्त गावांपैकी ६६ गावांना १०७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जानेवारीपासूनच जिल्ह्यात काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली. मात्र, आता त्याची तीव्रता वाढली आहे. दररोज नवनवीन गावे पाणीटंचाईच्या फेर्यात येत आहेत. विशेषत: पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांत पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. या तीन तालुक्यांमध्ये सध्या शंभर गावे पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद, कन्नड आणि सिल्लोड तालुक्यांतही काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावे आणि त्यांना पाणीपुरवठा करणार्या टँकरच्या संख्येत बरीच भर पडली आहे. चालू आठवड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या पावणेदोनशेवर पोहोचली आहे. तर पाणीपुरवठ्याच्या टँकरच्या संख्येने शंभरी गाठली. सध्या जिल्ह्यात अधिक तीव्र पाणीटंचाई जाणवणार्या ६६ गावांना १०७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर उर्वरित गावांमध्ये जवळपासच्या विहिरी अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात पैठण तालुक्यात सर्वाधिक ३५ टँकर सुरू आहेत. सोयगाव आणि खुलताबाद या तालुक्यांमध्ये मात्र, अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही. जिल्ह्यात प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना पाणी देण्यासाठी शक्य असेल त्या ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यात १४१ गावांमध्ये एकूण १६४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यातील ३३ विहिरी पाणीपुरवठ्याचे टँकर भरण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. मराठवाड्यात आजघडीला २५१ टँकर सुरू आहेत. यामध्ये औरंगाबादमध्ये सर्वाधिक १०७ टँकर आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ८५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ५२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय जालना जिल्ह्यात ४ आणि नांदेड जिल्ह्यात ३ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील टँकर संख्या तालुका टँकर औरंगाबाद १३ फुलंब्री ०४ पैठण ३५ गंगापूर १९ वैजापूर ३० कन्नड ०२ सिल्लोड ०४ एकूण १०७