कामगारांची उपासमार
By Admin | Published: November 14, 2016 12:28 AM2016-11-14T00:28:28+5:302016-11-14T00:25:48+5:30
लातूर : शहरातील बाजारपेठेतील दैनंदिन उलाढा २० कोटींच्या घरात असून, गेल्या पाच दिवसांपासून ही उलाढालच कोलमडल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत
लातूर : शहरातील बाजारपेठेतील दैनंदिन उलाढा २० कोटींच्या घरात असून, गेल्या पाच दिवसांपासून ही उलाढालच कोलमडल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी, कामगारांना मजुरी देण्यासाठी पैसेच नसल्यामुळे अनेक ठिकाणची कामे सध्याला बंद आहेत. काम असूनही पैशाअभावी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून शिवाजी चौकातील कामगारांचा नाकाही गर्दी नसल्याने ओसाड असल्याचे चित्र आहे.
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना पैशाअभावी आपले व्यवहार थांबवावे लागले आहेत.
दैनंदिन व्यवहारासाठी हाती पैसाच नसल्यामुळे जीवनावश्यवक वस्तूंची खरेदीही करता आली नाही. गेल्या पाच दिवसांपासून शहरतील शाहू चौक, विवेकानंद चौक, बसवेश्वर चौक, गूळ मार्केट, सुभाष चौक, गंजगोलाई परिसर, सराफलाईन, गांधी चौक, गाव भाग, मिनी मार्केट, गांधी मार्केट, शाहू कॉलेज परिसर, अशोक हॉटेल, खोरी गल्ली, सावेवाडी परिसर, शिवाजी चौक, उषाकिरण थिएटर परिसर, पाण्याची टाकी, अश्वमेघ हॉटेल, पाच नंबर चौक, औसा रोड परिसर, नंदी स्टॉप, खर्डेकर स्टॉप, राजीव गांधी चौक, जुना आणि नवीन रेणापूर नाका आदीं परिसरात असलेल्या विविध राष्ट्रीयकृत बँका आणि एमटीएमवर गेल्या पाच दिवसांपासून पैसे मिळविण्यासाठी रात्रं-दिन रांगा लागून आहेत.
दिवस-दिवस रांगेत थांबूनही पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी आता बँकेच्या खातेदारांसह नागरिकांतून वाढल्या आहेत.