भाडे वसुलीसाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 09:55 PM2019-06-29T21:55:27+5:302019-06-29T21:55:38+5:30
भाडे वसुलीसाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी वाळूज महानगरातील विटावा येथे घडली.
वाळूज महानगर : भाडे वसुलीसाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी वाळूज महानगरातील विटावा येथे घडली.
संभाजी भाऊसाहेब बनकर (४५, रा. अंबेलोहळ) हे गंगापूर तालुक्यातील गुरुधानोरा येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विटावा येथे खोल्या असून, त्या भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. ते शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता खोलीचे भाडे घेण्यासाठी विटावा येथे गेले होते. दरम्यान, रेखा दाभाडे यांचा शेजाऱ्यांसोबत वाद सुरू होता.
बनकर वाद सोडविण्यासाठी गेले असता संदीप नरवडे, राहुल नरवडे व अन्य तीन महिलांनी त्यांना मारहाण केली, तर रेखा दाभाडे ही किरकोळ कारणावरून सतत शिवीगाळ करते, तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची व मुलाला जिवे मारण्याची धमकी देते.
शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संभाजी बनकर याला बोलावून घेत माझ्यासह मुलीला व सुनेला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे रुक्मणबाई यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. कारभारी देवरे करीत आहेत.