कचरा टाकण्यासाठी जागेची शोधाशोध
By Admin | Published: October 12, 2016 12:44 AM2016-10-12T00:44:56+5:302016-10-12T01:11:18+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला गेल्या काही वर्षांपासून कचरा फेकला जात आहे.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला गेल्या काही वर्षांपासून कचरा फेकला जात आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने रुग्णांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो. ओला-सुका कचऱ्यासह वैद्यकीय घनकचराही उघड्यावर टाकला जातो. हा प्रकार रोखण्यासाठी व परिसर दुर्गंधीमुक्त होण्यासाठी घाटी प्रशासनाने ओला-सुका कचरा टाकण्यासाठी आता अन्य जागेची शोधाशोध सुरू केली आहे.
घाटी रुग्णालयातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ‘इन्सिनरेटर’ बसविले. यामध्ये टाकलेला कचरा उच्च उष्णतेमुळे जळतो. याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. प्रारंभी या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करण्यात आला; परंतु काही कालावधीनंतर ही यंत्रणा बंद पडली. तेव्हापासून ही यंत्रणा सुरू झालेली नाही. त्यानंतर घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीकडून दररोज रुग्णालयातील घनकचरा उचलण्यात येतो.
रुग्णालयातील ओला-सुका कचरा मनपातर्फे उचलण्यात येतो. जमा होणारा हा सर्व कचरा ‘इन्सिनरेटर’च्या जागेसमोर फेकला जातो. बाजूलाच मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाची इमारत आहे. कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. गेली काही वर्षे या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात
आले.
ओला-सुका कचऱ्याबरोबर या ठिकाणी सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, काढलेले प्लास्टर, तपासणी केलेल्या रक्ताच्या बाटल्या, वापरलेले रबरी हातमोजे आदी वैद्यकीय घनकचराही उघड्यावर फेकला जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला. या प्रकारामुळे रुग्णांबरोबर कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. हा प्रकार तात्काळ थांबविण्यासाठी सोमवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. घनकचरा उघड्यावर फेकला जाणार नाही, याची काळजी घेण्याची सक्त सूचना करण्यात आली.