गावी जाण्याचे त्रांगडे कायम; ई-पास मिळविण्यात २० हजार नागरिक नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 07:42 PM2020-05-14T19:42:56+5:302020-05-14T19:45:03+5:30
पोलीस आयुक्तालयाकडे प्राप्त झाले परप्रांतीय कामगारांचे ३९ हजार ५९१ अर्ज
औरंगाबाद : बाहेरगावी जाण्यासाठी आॅनलाईन ई-पास मिळविण्यासाठी तब्बल ३९ हजार ५१५ अर्ज पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाले. यापैकी सुमारे २० हजार ४३८ नागरिकांना अर्जातील त्रुटींमुळे ई-पास नाकारण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २१ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. नोकरी, धंदा आणि शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात आलेले हजारो नागरिक अडकून पडले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार १ मेपासून औरंगाबाद शहरात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना आॅनलाईन आणि आॅफलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलीस प्रशासनाने उपलब्ध केलेल्या ई-मेलवर आजपर्यंत ३९ हजार ५१५ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. आॅनलाईन अर्ज सादर करताना नियमावलीनुसार शारीरिकदृष्ट्या प्रवासासाठी तंदुरुस्त आहे आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे नोंदणीकृत डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडणे, ज्या वाहनाने प्रवास करणार आहात त्याचा नोंदणी क्रमांक, शिवाय प्रवाशांचे आधारकार्ड जोडणे गरजेचे आहे.
औरंगाबाद शहरात आणि औद्योगिक वसाहतीत हजारो परप्रांतीय कामगार, मजूर कार्यरत आहेत. ही मंडळीही आता त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आॅनलाईन अर्ज करीत आहेत. ग्रुप लीडरमार्फत त्यांना अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर सर्वांचे स्वतंत्र वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सादर करण्याऐवजी सर्वांची नावे असलेले एकच प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. आॅनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध झाल्यापासून आजपर्यंत तब्बल ३९ हजार ५१५ अर्ज पोलीस प्रशासनाला प्राप्त झाले. सुमारे ८० ते ९० हजार नागरिकांचे हे एकत्रित अर्ज आहेत. एका अर्जावर ५० ते ६० लोकांचा ग्रुप आहे. अर्जातील चुका आणि त्रुटींमुळे निम्म्याहून अधिक अर्थात २० हजार ४३८ अर्ज बाद करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने आजपर्यंत १५ हजार ५०६ अर्जदारांना बाहेरगावी जाण्याचा ई-पास दिला आहे.
विविध जिल्ह्यांनी नाकारला नागरिकांना प्रवेश
राज्यातील नवी मुंबई, लातूर, ठाणे, परभणी, सोलापूर आणि पिंपरी चिंचवड आदी जिल्हा प्रशासनाने पत्र पाठवून रेड झोनमधील नागरिक, कोविड-१९ ची लक्षणे असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
.......