वंदे मातरम् सभागृहाच्या नमनालाच विघ्न; वीज बिलाचे थकलेले ११ लाख भरणार कसे ?

By योगेश पायघन | Published: December 18, 2022 06:52 AM2022-12-18T06:52:57+5:302022-12-18T06:55:01+5:30

सभागृहाचे भाडेदर निश्चित झाले आहेत मात्र, देखभालीचा प्रश्न अनुत्तरितच आहे

hurdles on the start of Vande Mataram auditorium; How to pay the outstanding electricity bill of 11 lakhs? | वंदे मातरम् सभागृहाच्या नमनालाच विघ्न; वीज बिलाचे थकलेले ११ लाख भरणार कसे ?

वंदे मातरम् सभागृहाच्या नमनालाच विघ्न; वीज बिलाचे थकलेले ११ लाख भरणार कसे ?

googlenewsNext

- योगेश पायघन
औरंगाबाद :
भव्य, देखणी अत्याधुनिक सोयी-सुविधांसह उभारलेल्या वंदे मातरम् सभागृहाने शहराच्या वैभवात भर घातली. मात्र, सभागृहाची देखभाल आणि विजेचा खर्च कसा भागवणार, असा प्रश्न सतावत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृह एखाद्या एजन्सीला देण्याचे सुचविले होते; तर विरोधी पक्षनेत्यांनी खासगीकरण नको स्वतंत्र यंत्रणा उभारणीची मागणी केली. त्यापाठोपाठ आता उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती सध्याचे थकीत ११.३० लाखांचे वीज बिल आहे. ते कसे भरावे, असा प्रश्न उद्भवला आहे. सभागृहाची भाडेदर निश्चिती झाल्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मात्र, पुढे देखभालीचे काय करायचे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

उच्च शिक्षण विभागाचे वंदे मातरम् सभागृह उभे राहिले. सप्टेंबर महिन्यातच लोकार्पणासाठी सज्ज झाले. अखेर मुहूर्त मिळाल्यावर गेल्या १० डिसेंबर रोजी त्याचे लोकार्पण झाले. डिसेंबरपर्यंत साडेअकरा लाखांचे वीज बिल थकले आहे. ते भरण्यासाठी नाट्यगृह विविध कार्यक्रमांना भाड्याने देऊन त्यातून देखभाल व वीजबिलाचा खर्च भागवण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने कसरत सुरू केली आहे. नाट्यगृहाचे एक दिवसाचे भाडे तब्बल दीड लाख रुपये निश्चित करण्यात आले असून, पद्म फेस्टिव्हलच्या पाच दिवसांच्या कार्यक्रमांसाठी हे सभागृह देण्यात आले आहे. यातून साडेचार लाख रुपयांचे भाडे मिळणार आहे. उच्च शिक्षण विभागाला वीज बिल भरण्यासाठी आणखी सात लाखांची जमवाजमव करावी लागणार आहे.

केंद्रेकरांनी जबाबदारी सोपवली जिल्हाधिकाऱ्यांकडे
नवनिर्मित वास्तूचे व्यवस्थापन, उपयोजन, देखभालीसाठी शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. विभागीय आयुक्तांनी वंदे मातरम् सभागृहाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली १२ डिसेंबर रोजी सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ, महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही. डी. जोशी, संतोष थेरोकार, समितीचे सदस्य सचिव, सहसंचालक डाॅ. सतीश देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या समितीच्या बैठकीत अनामत रक्कम व दिवसनिहाय भाडे निश्चित करण्यात आले.

या आहेत सुविधा
किलेअर्क दोन एकर परिसरात ८०३३.६७ चौरस मीटरमध्ये ४३ कोटी रुपये खर्चून चार मजली सभागृहाची उभारणी केली आहे. इमारतीत टेरेसवरील उद्यान, २ हाॅल, १ आर्ट गॅलरी, सभागृहात १,०७६ आसन व्यवस्था असून, त्यांपैकी ३०१ आसनांची गॅलरी आहे. २५० व्यक्तींची क्षमता असलेले ॲम्फी थिएटर, प्रदर्शन केंद्र, व्हीआयपींसाठी ५ रूम, ६ अतिथी कक्ष, १०० कार व २०० दुचाकींचे वाहनतळ, २ मेकअप रूम, ४ ग्रीन रूम, २ प्रॅक्टिस हॉल असून, १.०४ कोटींची अत्याधुनिक व ऑटोमॅटिक प्रकाशयोजना, साउंड सिस्टम, एचव्हीएसी, लिफ्ट, आदी सुविधा आहेत.

स्वतंत्र बँक खाते उघडून व्यवहार होणार
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीत सभागृहाच्या भाड्याचा दर निश्चिती केला. त्यानुसार पद्म फेस्टिव्हल होत आहे. आणखी काही संस्थांकडून सभागृहाची कार्यक्रमासाठी मागणी आहे. या भाड्याच्या रकमेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडून वीज बिल व इतर खर्चाची व्यवस्था करत आहोत.
- डाॅ. सतीश देशपांडे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, औरंगाबाद

खासगी कार्यक्रमांसाठी असे असेल भाडे...
मुख्य सभागृह पहिला दिवस : दीड लाख रुपये
दुसरा दिवस व पुढील दिवस : ७५ हजार रुपये
खुले नाट्यगृह पहिला दिवस : १० हजार रुपये
एम्पी थिएटर दुसरा दिवस : ५ हजार रुपये
मुख्य कलादालन : २० हजार रुपये
छोटे कलादालन : १५ हजार रुपये
सेमिनार हाॅल : २५ हजार रुपये
अनामत रक्कम : ५० हजार रुपये

Web Title: hurdles on the start of Vande Mataram auditorium; How to pay the outstanding electricity bill of 11 lakhs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.