राज ठाकरे यांच्या सभेवरून वावटळ; औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरूच; विरोधाची धार कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 08:07 AM2022-04-21T08:07:48+5:302022-04-21T08:10:36+5:30
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १ मे रोजी सायंंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या नियाेजित सभेच्या अनुषंगाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. या सगळ्या घडामोडींमध्ये सभेला विरोध करणाऱ्या निवेदनांची संख्या जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे वाढली आहे.
औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राजकीय रान उठविले असून त्या पार्श्वभूमीवर येथे १ मे रोजी आयोजित केलेल्या जाहीर सभेवरून निर्माण झालेल्या वादंगाने बुधवारी वावटळीचे रूप धारण केले. सभा घेऊ नये यासाठी येणाऱ्या निवेदनांची संख्या वाढत असतानाच मनसे पदाधिकारी मात्र सभा घेण्यावर ठाम आहेत.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १ मे रोजी सायंंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या नियाेजित सभेच्या अनुषंगाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. या सगळ्या घडामोडींमध्ये सभेला विरोध करणाऱ्या निवेदनांची संख्या जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे वाढली आहे. ठाकरेंची सभा आणि वाढता विरोध यामुळे प्रशासनाची कोंडी होत असून, पोलीस प्रशासनाने सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही.
मंगळवारी चार ते पाच संघटनांनी निवेदने देऊन सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यानंतर बुधवारी अ. भा. सेनेचे महेंद्र साळवे, सतीश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन सामाजिक शांतता अबाधित राहण्यासाठी सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे की, कुणाच्याही निवेदनाला आम्ही भीक घालीत नाही. सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे. सामाजिक शांतता भंग होईल, असा सभेचा उद्देश नसून ही जागरण सभा आहे. सभेमुळे कुठलाही सामाजिक सलोखा बिघडणार नाही, असा दावा धोत्रे यांनी केला.
...तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा
राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला परवानगी दिल्यास भारिप तथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा नेते सुमित भुईगळ यांनी दिला आहे.
काय लिहिले आहे ‘त्या’ होर्डिंग्जवर?
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप, विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्या दौऱ्याप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कार्टूनमधून केलेला प्रहार बुधवारी त्यांच्याच विरोधात होर्डिंग्ज रूपाने निराला बाजारमध्ये झळकाविण्यात आला असून त्यावरून चर्चेचे पेव फुटले आहे.
हे होर्डिंग्ज राज यांच्या विरोधात आहे. त्यावर असा मजकूर लिहिलेला आहे की, अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्रीराम मंदिराला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज यांना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व, असा मजकूर होर्डिंग्जवर आहे. हे होर्डिंग्ज कुणी लावले, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.