पीकविम्यासाठी धांदल!
By Admin | Published: July 28, 2016 12:29 AM2016-07-28T00:29:58+5:302016-07-28T00:48:13+5:30
जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोंढा शाखेत उडालेल्या गोंधळात कॅश काऊंटरच्या काचा फुटल्याने शाखा व्यवस्थापकाने बँकच बंद केल्याने बुधवारी शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली.
जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोंढा शाखेत उडालेल्या गोंधळात कॅश काऊंटरच्या काचा फुटल्याने शाखा व्यवस्थापकाने बँकच बंद केल्याने बुधवारी शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली. दरम्यान, गर्दी वाढूनही पोलिस बंदोबस्त नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी रेटारेटीतून मार्ग काढावा लागत आहे. यासाठी बँकेकडूनही नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येथील जि.म.स. बँकेच्या मोंढा शाखेला जालना तालुक्यातील १२ सोसायट्या जोडलेल्या आहेत. त्यात सुमारे १५ हजार शेतकरी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत विमा भरण्यासाठी शेतकरी या ठिकाणी गर्दी करीत आहेत. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असल्याने बुधवारी मोंढा शाखेत शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
ही शाखा छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात दुसऱ्या मजल्यावर आहे. त्यामुळे खालच्या मजल्यावर शेतकऱ्यांची गर्दी झालेली होती. त्यातूनच प्रचंड रेटारेटी झाली. दुपारी चार वाजेच्या सुमारास ही गर्दी आणखीच वाढल्याने रेटारेटीत समोरील शेतकरी कॅश काऊंटरवर पडले. त्यामुळे कॅश काऊंटरची काच फुटली. ही काच फुटताच बँकेत एकच गोंधळ उडाला. त्या गोंधळामुळे बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद केले. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शाखेच्या बाहेरच उभे होते. शेवटी कंटाळून अनेक शेतकरी घराकडे परतले. (प्रतिनिधी)