महिला सरपंचासह पतीला उपसरपंचाच्या दिराकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:02 AM2021-07-31T04:02:56+5:302021-07-31T04:02:56+5:30
शिऊर : वाघला येथील सरपंच पती आणि उपसरपंच पतीमध्ये किरकोळ कारणावरून वाद आहेत. गुरुवारी या वादाचे रूपांतर ...
शिऊर : वाघला येथील सरपंच पती आणि उपसरपंच पतीमध्ये किरकोळ कारणावरून वाद आहेत. गुरुवारी या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. उपसरपंचाचे दीर भाऊसाहेब गोरे यांनी सरपंच अनिता शिंदे व त्यांचे पती संजय शिंदे यांना मारहाण केली.
वाघला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा महिनाभरापूर्वी अनिता शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, जानेवारीत ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर सरपंच निवडीत एकमेव दावेदार असलेल्या अनिता शिंदे या गैरहजर राहिल्याने हे पद रिक्त राहिले होते. तब्बल सहा महिने गावचे सरपंचपद रिक्त राहिल्याने हा कारभार उपसरपंच सुमित्रा गोरे यांच्याकडे होता. नियमानुसार सरपंचपदाची पुन्हा निवडणूक होऊन ओबीसी प्रवर्गासाठी एकमेव उमेदवार असलेल्या अनिता शिंदे या बिनविरोध सरपंच झाल्या. सरपंच व उपसरपंच या एकाच पॅनलमधून निवडून आल्या, हे विशेष. २६ जुलै रोजी गावात वॉटर फिल्टरचे लाइन पोल उभे करण्यात आले. त्यानंतर मोबाइलवर उपसरपंच पती सुदाम गोरे यांनी संजय शिंदे यांना ‘तू गावात कशाला येतो, राजीनामा दे, गावात आला तर पाय तोडू,’ अशी धमकी दिली. त्या धमकीमुळे संजय शिंदे यांनी शिऊर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी, २९ जुलै रोजी गावात डिजिटल बोर्ड लावत असताना सुदाम गोरे यांचा भाऊ विजय गोरे याने सरपंच अनिता शिंदे आणि त्यांचे पती संजय शिंदे यांना तू माझ्या भावावर केस का केली, म्हणत शिवीगाळ करून दोघांनाही मारहाण केली. याप्रकरणी विजय गोरे याच्यावर शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.