पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह सासू-सासरे निर्दोष मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:08 PM2019-02-04T23:08:06+5:302019-02-04T23:09:06+5:30
पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह मृताचे सासू-सासरे यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली.
औरंगाबाद : पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह मृताचे सासू-सासरे यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली.
आरोपी पती अनिल विश्वनाथ पथवे (रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि.अहमदनगर) हा गेली १३ वर्षे कारागृहातच आहे. तर त्याचे आई-वडीलही सात वर्षे कारागृहात होते. त्यांना नंतर जामीन मंजूर झाला. या तिघांना संगमनेरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
मृत सीताबाईची आई शांताबाई यांनी फिर्याद दिली होती की, आरोपी अनिलचे लग्न २००३ मध्ये त्यांची मुलगी सीताबाई हिच्याशी झाले होते. १३ नोव्हेंबर २००५ रोजी सीताबाई घरातून गायब झाली. १६ नोव्हेंबर २००५ रोजी तिचा मृतदेह त्यांचे शेजारी केशव जगताप यांच्या विहिरीत आढळला होता. मृतदेहाचे जागेवरच दोन डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवालात त्यांनी सीताबाईचा बुडून मृत्यू झाल्याचे नमूद केले; परंतु अंतिम अहवालात गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद केले. अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मूलबाळ होत नसल्याने सीताबाईचा खून करण्यात आल्याचे यात म्हटले होते.
संगमनेर सत्र न्यायालयाने अनिल, त्याची आई सावित्रीबाई आणि वडील विश्वनाथ पथवे यांना कलम ४९८ (अ) मधून मुक्त केले, पण खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात तिघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केले. सुनावणीदरम्यान खंडपीठाने प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे पाठविले. मात्र तिघांचीही शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केली.
या शिक्षेविरुद्ध तिघांनीही अॅड. व्ही. डी. सपकाळ यांच्यामार्फत खंडपीठात अपील दाखल केले. सुनावणीच्या वेळी म्हणणे मांडण्यात आले, की शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांचे दोन अहवाल संशयास्पद आहेत. सीताबाई ही १३ नोव्हेंबरला गायब झाली आणि १६ ला तिचा मृतदेह आढळला. पती व सासरच्यांनी तिचा बराच शोध घेतला. पोलीस पाटील यांच्या जबाबात, मृत सीताबाई ही यापूवीर्ही दोन-तीन वेळा घरातून अचानक निघून गेल्याचे स्पष्ट झालेले आहे. तसेच हुंडाबळीच्या आरोपातून सत्र न्यायालयाने आरोपींना मुक्त केले आहे. आरोपी ठाकर समाजाचे आहेत. त्यांच्यामध्ये दोन विवाहाची प्रथा अजूनही आहे. त्यामुळे मूलबाळ होत नसल्याने खून करण्याचे काहीही सबळ कारण दिसून येत नाही. अॅड. सपकाळ यांना अॅड. आदिनाथ जगताप आणि अॅड.संदीप सपकाळ यांनी साह्य केले.
--------------