भरधाव ट्रकने पती आणि गर्भवती पत्नीस उडवले; शस्त्रक्रिये दरम्यान बाळ दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 02:01 PM2021-10-23T14:01:46+5:302021-10-23T14:02:14+5:30
औरंगाबाद - नगर महामार्गावर पंढरपुरातील तिरंगा चौकात पाठीमागून वेगाने येणाऱ्या ट्रकने उडवले
वाळूज महानगर : भरधाव ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया करताना बाळ दगावले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या फरार ट्रक चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश भगुरे (रा. वाळूज) हे मंगळवारी (दि. १९) गर्भवती पत्नी राखी भगुरे यांच्यासह दुचाकीने ( एमएच १७ एपी ७४१५) वाळूजहून औरंगाबादला जात होते. औरंगाबाद - नगर महामार्गावर दुपारी १ वाजता पंढरपुरातील तिरंगा चौकात पाठीमागून वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक आरजे १० जीए ७४९९) त्यांना जोराची धडक दिली. या धक्क्याने दुचाकीस्वार पतीे - पत्नी रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
राखी भगुरे ९ महिन्यांची गर्भवती असल्याने त्यांना व पोटातील बाळाच्या जिवास धोका असल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. शस्त्रक्रिया करताना त्यांचे बाळ दगावले. सुरेश भगुरे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फरार ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पो. हे. कॉ. जाधव याबाबत तपास करीत आहेत.