पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पतीची आत्महत्या
By राम शिनगारे | Published: December 19, 2022 07:52 PM2022-12-19T19:52:36+5:302022-12-19T19:52:48+5:30
एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल : जिवे मारण्याची दिली होती धमकी
औरंगाबाद : घरासमोरच राहणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने पतीला 'तुझी पत्नी माहेरी का नेऊन घातली, तिला घेऊन् ये, नाहीतर तुला मारून टाकेल' अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या पतीने १८ डिसेंबर रोजी सकाळी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी प्रियकराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंदविण्यात आला.
अर्जुन रावसाहेब भिेसे (३४, रा. ग.नं. २, नारेगाव) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. रामभाऊ साळुंके (८०, रा. नारेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा आकाश (२६) याने १८ डिसेंबर रोजी राहत्या घरातील खोलीत गळफास घेतल्याचे उघडकीस आले. आकाश याचे २०१६ मध्ये जळगाव जिल्ह्यातील एका मुलीशी लग्न झाले होते. त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या अर्जुन भिसे याच्यासोबत तिचे मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. त्यावरून भिसे व सुनेलाही अनेकवेळा सासऱ्यासह इतरांनी समजावून सांगितले. मात्र, दोघांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. उलट भिसे हाच आकाशला सतत धमकी देत होता. त्यामुळे मागील १५ दिवसांपूर्वी आकाश याने पत्नीला मोहेरी नेऊन सोडले.
त्यामुळे चिडलेल्या आरोपी भिसे याने 'तुझी पत्नी माहेरी का नेऊन घातली, तिला घेऊन् ये, नाहीतर तुला मारून टाकेल' अशी धमकीच आकाशला दिली होती. त्यामुळे आकाश तणावात होता. १७ डिसेंबर रोजी त्याने सर्वांसोबत जेवण केले. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसून आला. त्याला विचारणा केल्यारव त्याने भिसेची भिती वाटत असल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर झोपायला गेलेल्या खोलीत सकाळी आत्महत्याच केल्याचे उघड झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक शिवाजी चौरे करीत आहेत.
दुग्धव्यवसायावर कुटुंबाचा उदारनिर्वाह
मृत आकाश याच्यासह कुटुंब दुग्धव्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्याचे वडिल ८० वर्षांचे असून, त्यास १५ वर्षांचा एक भाऊ तर पाच बहिणी आहेत. त्यामुळे घरातील कर्ता तरुणाच गेल्यामुळे कुटुंब आडचणीत सापडले आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची एक टीम काम करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.