चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा काटा काढणाऱ्या पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 07:36 PM2019-05-31T19:36:44+5:302019-05-31T19:40:38+5:30
आशाबाई यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने तीन ते चार वेळा वार केलेले होते.
बीड : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा कुºहाडीने वार करुन खून करणाऱ्या पतीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. माजलगाव येथील अतिरिक्त सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
वसंत गुणाजी काळे (५५, रा. कुंडी, ता. धारुर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव असून, आशाबाई असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. त्यांच्या घराशेजारीच चुलते भाऊराव बाबुराव काळे (रा. कुंडी) हे राहतात. १५ मार्च २०१७ रोजी दुपारी २.३० वाजता वसंतची मुलगी राधा ज्ञानोबा भांड ही रडत घरातून बाहेर आली. यावेळी भाऊरावांनी तिला रडण्याचे कारण विचारले. यावेळी राधा म्हणाली, माझे वडील वसंत हे आता घरी आले होते. तुझ्या आईस मारुन टाकले आहे मला दोन भाकरी बांधून दे असे म्हणत भाकरी घेऊन ते निघून गेले. त्यानंतर पाऊस सुरु झाला. अर्ध्या तासानंतर पावसाने उघडीप दिली. यावर भाऊराव काळे यांनी गावातील काही मुलांना वसंतचा शोध घेण्यासाठी पाठविले.
यावेळी आशाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. आशाबाई यांच्या गळ्यावर कुºहाडीने तीन ते चार वेळा वार केलेले होते. त्यानंतर भाऊराव यांच्या फिर्यादीवरुन सिरसाळा पोलीस ठाण्यात वसंत काळेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सिरसाळा ठाण्याचे सपोनि एच. बी. बोराडे यांनी तपास करुन दोषारोपपत्र ३ जून २०१७ रोजी न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासले. यात मुलगी राधा भांड, मुलगा माणिक काळे, पंच, साक्षीदार, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आलेल्या पुराव्यावरुन अतिरिक्त सत्र न्या. ए. एस. वाघमारे यांनी वसंतला भादंवि कायद्याचे कलम ३०२ प्रमाणे दोषी ठरवत जन्मठेप व ५ हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने वरिष्ठ सहाय्यक सरकारी वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक सरकारी वकील आर. ए. वाघमारे, पैरवी अधिकारी जे. एस. वाव्हळकर यांनी सहकार्य केले.