‘तुझ्या पत्नीसोबत लग्न करायचे आहे’ म्हणत पतीचे अपहरण; फोन करून विवाहितेलाही बोलावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:42 PM2022-06-23T12:42:28+5:302022-06-23T12:42:53+5:30

सातारा ठाण्यात गुन्हा दाखल : आरोपीला अटक, एक दिवसाची पोलीस कोठडी

Husband kidnapped for saying 'I want to marry your wife'; He also called the married woman by phone | ‘तुझ्या पत्नीसोबत लग्न करायचे आहे’ म्हणत पतीचे अपहरण; फोन करून विवाहितेलाही बोलावले

‘तुझ्या पत्नीसोबत लग्न करायचे आहे’ म्हणत पतीचे अपहरण; फोन करून विवाहितेलाही बोलावले

googlenewsNext

औरंगाबाद : मला तुझ्या पत्नीसोबत लग्न करायचे आहे, असे म्हणत पतीचे अपहरण केल्याचा प्रकार घडला. पतीचे अपहरण करून त्याच्या मोबाईलवरून पत्नीशी संपर्क साधत ‘तत्काळ भेटायला ये, अन्यथा पतीला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. यानंतर माहेरी गेलेल्या पत्नीने शहरात परत येत सातारा पोलिसांच्या मदतीने पतीची सुटका करून घेतल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.

दत्ता नाथाप्रसाद पवार (२३, रा. पांगरकरनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीस सातारा पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता याची फिर्यादी मिथुन (नाव बदललेले) व त्यांच्या पत्नी प्रिया (नाव बदललेले) सोबत पूर्वीपासून ओळख होती. प्रिया यांचे पार्लर होते. मिथुन हे एका कंपनीत नोकरीस आहेत. प्रिया यांच्यासोबत दत्ताची घनिष्ठ मैत्री होती. या मैत्रीची कुणकुण मिथुन यांना लागल्यानंतर त्यांनी पत्नीचा मोबाईल काढून घेत तिला माहेरी पाठवले. तसेच पार्लरही स्थलांतरित केले. दत्ताचा प्रियासोबत संपर्क होत नसल्यामुळे तो अस्वस्थ होता. 

त्याने रविवारी मिथुन यांची भेट घेत ‘आपण चहा घेऊ, मला तुझ्या पत्नीविषयी बोलायचे आहे’, असे सांगितले. त्यामुळे मिथुन हे स्वत:च्या दुचाकीवरून दत्ता यास घेऊन चहा पिण्यासाठी गेले. मात्र त्याने जबरदस्तीने दुचाकी एका घरासमोर नेली. त्या घराचे कुलूप उघडून त्यात मिथुन यांना नेऊन डांबले. नंतर मिथुन यांच्या दुचाकीसह मोबाईल ताब्यात घेतला. त्याच मोबाईलवरून प्रियास फोन करून 'मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, आता मला भेटायला ये, न आल्यास तुझ्या पतीला मारून टाकीन,' अशी धमकी दिली. मिथुन यांना 'तुझी पत्नी मला भेटायला आली नाही तर तुला कटरने कापून टाकीन' अशी धमकी दिली. या संवादानंतर प्रिया यांनी शहरात धाव घेत सातारा पोलिसांकडे मदत मागितली. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी मिथुन यांची सुटका करीत आरोपीला अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक शंकर शिरसाठ करीत आहेत.

Web Title: Husband kidnapped for saying 'I want to marry your wife'; He also called the married woman by phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.