दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती ठार, पत्नी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:04 AM2021-07-03T04:04:56+5:302021-07-03T04:04:56+5:30

वैजापूर : तालुक्यातील खंबाळा शिवारातील शेतवस्तीवर चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी नवविवाहित पती-पत्नीला लाकडासह धारदार हत्यारांनी जबर मारहाण केली. या ...

Husband killed, wife seriously injured in robbery | दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती ठार, पत्नी गंभीर

दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती ठार, पत्नी गंभीर

googlenewsNext

वैजापूर : तालुक्यातील खंबाळा शिवारातील शेतवस्तीवर चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी नवविवाहित पती-पत्नीला लाकडासह धारदार हत्यारांनी जबर मारहाण केली. या घटनेत पतीचा जागेवर मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी असून, बेशुद्धावस्थेत आहे. राजेंद्र जिजाराम गोरसे (२६) असे मयताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

वैजापूर-श्रीरामपूर रस्त्यावरील खंबाळा फाटा येथील शेतवस्तीवर जिजाराम राधाजी गोरसे राहतात. त्यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असून, मुलगा राजेंद्रचा विवाह ६ महिन्यांपूर्वी जानेवारी महिन्यात भायगाव येथील अंभोरे कुटुंबातील मोनिका(२२) हिच्याशी झाला होता. आजूबाजूला बऱ्याच शेतवस्त्या असल्याने हा परिसर गजबजलेला असतो. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री गोरसे कुटुंबीयांनी जेवण केले. यानंतर, राजेंद्र व मोनिका हे एका खोलीत तर अन्य कुटुंब दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री १ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी मागील बाजूने घरात प्रवेश केला. राजेंद्रच्या खोलीत प्रवेश करून, त्यांनी राजेंद्र व मोनिका यांच्यावर झोपेतच लाकूड व तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. यात राजेंद्र जागीच ठार झाला, तर मोनिका गंभीर जखमी झाली. आवाजामुळे जिजाराम हे जागे झाले. खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी खिडकीतून जोरजोराने आरडाओरड केली. परिसरातील नागरिक येत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. जिजाराम यांनी राजेंद्रच्या खोलीत जाऊन पाहिले असता, दोघे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तपासून राजेंद्रला मयत घोषित केले, तर मोनिका हिस बेशुद्धावस्थेत औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात हलविले आहे. घटनेची माहिती मिळताच, प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. भागवत फुंदे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पथकाला पुरणगाव रस्त्यावर एक बेवारस दुचाकी आढळली आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पाेउनि. विजय जाधव हे करीत आहेत.

चौकट

... तर अनर्थ टळला असता

गुरुवारी रात्री परिसरात चोर आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. याबाबत एकमेकांना फोन करून माहिती दिली गेली. परिसरातील सदाशिव निर्मळ यांनी जिजाराम गोरसे यांना फोन केला. मात्र, तो लागला नाही. संपर्क झाला असता, तर कदाचित ते सावध राहून ही घटना टळली असती. १५ दिवसांपासून चोरट्यांनी तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. महालगाव येथे तीन ठिकाणी चोरी, देवगाव शनी येथे दोन दिवसांपूर्वी दरोड्याची घटना घडली आहे. यामुळे नागरिक भयभीत आहेत.

चौकट

घातपाताचाही संशय

या घटनेत घातपाताचाही संशय व्यक्त केला जात आहे. दरोडेखोरांनी जिजाराम यांच्या घरात प्रवेश करून एका खोलीत झोपलेल्या राजेंद्र व मोनिका यांच्यावर झोपेतच हल्ला केला. घरातील दागिने व रक्कम चोरी गेली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे हा दरोडा की घातपात, असा संशय व्यक्त होत आहे.

फोटो :

020721\img-20210702-wa0184.jpg

हल्ल्यात ठार झालेले संतोष गोरसे यांचा फोटो

Web Title: Husband killed, wife seriously injured in robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.