दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा ब्लेडने गळा कापणाऱ्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 07:25 PM2018-06-26T19:25:04+5:302018-06-26T19:26:25+5:30
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नी द्वारकाबाईचा ब्लेडने गळा चिरून खून करणारा तिचा पती ठकुबा तुकाराम भागवत याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नी द्वारकाबाईचा ब्लेडने गळा चिरून खून करणारा तिचा पती ठकुबा तुकाराम भागवत याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
सिल्लोड तालुक्यातील पिंपळपेट येथील ठकुबा तुकाराम भागवतचे लग्न द्वारकाबाईसोबत घटनेच्या तेरा वर्षांपूर्वी झाले होते. ठकुबाला दारूचे व्यसन होते. तो कायम नशेत राहत होता. तो कामधंदा करत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी द्वारकाबाई वीटभट्टीवर काम करत होती. दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या ठकुबाने दारू पिण्यासाठी पत्नीला पैसे मागितले.
पैसे दिले नाही तर जिवे मारून टाकतो, अशी धमकी त्याने १४ नोव्हेंबर २०१५ रोजी दिली होती. त्याच दिवशी सायंकाळी त्याने पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. द्वारकाबाईने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिला बेदम मारहाण करत तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. ती मदतीसाठी आरडाओरड करत घराबाहेर आली. मात्र,अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे मरण पावली.
द्वारकाबाईचे मामा कैलास सीताराम वाघ (रा. वडोद बाजार) यांच्या तक्रारीवरून ठकुबा विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीअंती न्यायालयाने ठकुबाला भादंवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रूपये दंड ठोठावला.