पतीच निघाला मारेकरी
By Admin | Published: May 31, 2016 11:58 PM2016-05-31T23:58:11+5:302016-06-01T00:17:27+5:30
औरंगाबाद : चार दिवसांपूर्वी विवाहितेची आत्महत्या वाटणारे प्रकरण आता खुनात बदलले आहे. किरण पैठणे या शंभुनगरातील महिलेला तिचा पती राजेंद्र पैठणे याने
औरंगाबाद : चार दिवसांपूर्वी विवाहितेची आत्महत्या वाटणारे प्रकरण आता खुनात बदलले आहे. किरण पैठणे या शंभुनगरातील महिलेला तिचा पती राजेंद्र पैठणे याने तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेंद्रने किरणकडून आत्महत्या करीत असल्याची ‘सुसाईड नोट’ बळजबरीने लिहून घेतली होती, असे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले. शंभुनगर येथील किरण राजेंद्र पैठणे या महिलेचा २७ मे रोजी रात्री ११ ते १२ या वेळेत घराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. किरणने आत्महत्या केल्याचा दावा राजेंद्रने केला होता. एवढेच नव्हे तर तिने लिहिलेली ‘सुसाईड नोट’देखील पोलिसांच्या हवाली केली होती. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्या बहिणीच्या मृत्यूस राजेंद्र हाच जबाबदार असून, त्याच्या छळामुळेच किरणने आत्महत्या केल्याची तक्रार तिचा भाऊ शरद हिवाळे (रा. जालना) याने दुसऱ्या दिवशी केली होती. त्यानुसार राजेंद्र याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फौजदार मनीषा लाड यांनी राजेंद्रला अटक केली होती.एक जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. बालकामुळे मिळाली कलाटणी पैठणे दाम्पत्याच्या नऊवर्षीय मुलाच्या जबाबाने या प्रकरणास कलाटणी मिळाली. पोलिसांचे पथक बालकाकडून कौटुंबिक माहिती घेत होते. त्यावेळी त्याने सांगितलेल्या हकीकतीमुळे पोलीसही चक्रावून गेले. बालकाचा ‘इन कॅमेरा’ जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. तीन मजली इमारत बहिणीची व्यवसायाने वीज कंत्राटदार असणारा राजेंद्र पैठणे हा तीन मजली इमारतीत राहत होता; परंतु ही इमारत त्याच्या बहिणीची आहे. किरण आणि राजेंद्र यांना ११ आणि ९ वर्षांची दोन मुले आणि १३ महिन्यांची मुलगी, अशी तीन अपत्ये आहेत. याशिवाय एका नातेवाईकाची मुलगीदेखील शिक्षणानिमित्त त्यांच्याकडे वास्तव्यास होती. या मुलीची एका युवकासोबत मैत्री होती. किरणला या मैत्रीबाबत माहिती होती; परंतु तिने आपल्यापासून ती लपवून ठेवल्याचा संशय राजेंद्रला होता. मुलासही केली मारहाण २७ मे रोजी रात्री अकरा वाजता राजेंद्र हा दारूच्या नशेत घरी आला. त्याने किरणशी भांडण उकरून काढले. ‘सुसाईड नोट’ लिहून देण्यासाठी त्याने किरणला बेदम मारहाण केली. किरणने नकार देताच मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. आईची अवस्था बघून नऊवर्षीय बालक तिला बिलगला. राजेंद्रने त्याला मारहाण करून आईपासून वेगळे केले आणि खोलीबाहेर हाकलून दिले. राजेंद्रने मुलास मारहाण केल्याचे बघून किरणने अखेर ‘सुसाईड नोट’ लिहून दिली. त्यानंतर राजेंद्रने पुन्हा मारहाण करून किरणला ओढतच तिसऱ्या मजल्यावर नेऊन खाली ढकलून दिले. आई खाली पडल्याचे पाहून मुलांनी आरडाओरड केली. आपणास काहीच माहिती नाही, अशा अविर्भावात राजेंद्रही खाली धावत आला. गल्लीतील माणसे जमली, पोलीसही दाखल झाले. तेव्हा त्याने किरणची ‘सुसाईड नोट’ काढून दिली होती.