मनपात पुन्हा ‘पती’ राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2016 12:30 AM2016-04-05T00:30:01+5:302016-04-05T00:46:37+5:30
औरंगाबाद : महापालिकेत वेगवेगळ्या आरक्षणानुसार आणि खुल्या प्रवर्गातून अनेक महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. यातील पन्नास टक्के महिलांचे ‘पती’च कारभार पाहत आहेत
औरंगाबाद : महापालिकेत वेगवेगळ्या आरक्षणानुसार आणि खुल्या प्रवर्गातून अनेक महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. यातील पन्नास टक्के महिलांचे ‘पती’च कारभार पाहत आहेत. मागील वर्षभरापासून कामेच होत नसल्याचे कारण दाखवून अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणे सुरू करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांवर कारवाई करावी, असा मागणीचा सूर अधिकाऱ्यांमध्ये उमटत आहे.
बोटावर मोजण्याएवढ्याच नगरसेविकांचे पती किंवा नातेवाईक हस्तक्षेप करीत नाहीत. स्वत: महिला नगरसेविका महापालिकेतील कामकाज पाहतात. महापालिकेच्या सभागृहात यंदा सर्वाधिक पन्नास महिला निवडून आल्या आहेत. त्यातील ३५ हून अधिक महिला नगरसेविकांचा कारभार इतर मंडळीच पाहतात. महापालिकेच्या आवारात आणि कारभारात नगरसेविकांचे पती, दीर, मुलगा थेट हस्तक्षेप करीत आहेत. अधिकारी निमूटपणे हा त्रास सहन करीत आहेत. काही महिला नगरसेविकांचे कार्यकर्ते, खाजगी स्वीय सहायकही अक्षरश: फायलींची पळवापळवी करीत आहेत. महापालिकेच्या विविध कॅमेऱ्यांमध्ये ‘पती’राज मंडळींचे कारनामे टिपल्या गेले आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी आहे.