‘पती शैलेंद्रनेच स्वत:ला मारून घेतले’; पोलीस कोठडीतील पूजा राजपूतचा जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:12 PM2019-09-21T18:12:10+5:302019-09-21T18:13:45+5:30
उद्योजक शैलेंद्र राजपूत खून प्रकरण
औरंगाबाद : उद्योजक पती शैलेंद्र शिवसिंग राजपूत यांचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या पूजा राजपूतने आपण पतीला मारलेच नाही, उलट शैलेंद्रनेच स्वत:ला मारून घेतल्याचे वारंवार सांगत आहे, पूजा राजपूत स्वत:ला वाचविण्यासाठी खोटे बोलत असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पूजाविरोधात आणखी पुरावे गोळा करण्यात पोलीस अधिकारी व्यग्र आहेत.
उल्कानगरीतील खिंवसरा पार्कमधील मे-फेअर या उच्चभ्रू वसाहतीत राहणारे उद्योजक शैलेंद्र राजपूत यांची सोमवारी मध्यरात्री त्यांच्या घरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. शैलेंद्रचे भाऊ सुरेंद्र यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात पूजा राजपूतविरोधात पतीच्या हत्येचा गुन्हा नोंदविला. संशयावरून पोलिसांनी पूजाला अटक केली आहे. तेव्हापासून पूजा जवाहरनगर पोलिसांच्या कोठडीत आहे. अटके नंतर तब्बल २४ तास पूजा कोणासोबतही बोलली नाही. ती शांतपणे बसून होती.
पोलिसांनी शैलेंद्रच्या खुनासंदर्भात तिची चौकशी केली तेव्हा शैलेंद्रचा खून मी केलाच नाही, असे ती म्हणत आहे. हा खून नाही, तर शैलेंद्रनेच रागाच्या भरात स्वत:ला चाकू मारून घेतल्याने अति रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे ती पोलिसांना सांगत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी ती पोलिसांना असेच सांगत आहे. असे असले तरी पूजा राजपूत बचावात्मक दृष्टिकोनातून पोलिसांना असे सांगत असावी, असा संशय पोलीस अधिकाऱ्यांना असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पतीच्या हत्येपासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न पूजाकडून होत असला तरी, परिस्थितीजन्य पुरावे तिच्याविरोधात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शैलेंद्रचा भोसकून खून केल्यांनतर स्वच्छ करून ठेवलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला. शिवाय खूनप्रसंगी रक्ताने माखलेले कपडे बदलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दोन्ही मुलींचा जबाब ठरणार महत्त्वाचा
शैलेंद्र आणि पूजा यांच्या ६ आणि १६ वर्षीय वयाच्या दोन्ही मुली घटनेच्या रात्री घरीच होत्या. यामुळे त्यांचा जबाब या गुन्ह्याचा तपासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वडिलांचा खून आणि आईला पोलिसांनी अटक केल्याचे समजल्यापासून दोन्ही मुली मानसिक धक्क्याखाली आहेत. परिणामी पोलिसांना त्यांचे म्हणणे नोंदविता आले नाही. दोन्ही मुलींचा जबाब घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.