पतीचा त्रास झाला असह्य; मुलांना खेळायला जाण्यास सांगून मातेने घरात घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 01:33 PM2021-05-12T13:33:52+5:302021-05-12T13:35:20+5:30
आईच्या सांगण्यावरून मुले समोर खेळण्यासाठी गेली. नंतर ते जवळच राहणाऱ्या आजीकडे गेले.
औरंगाबाद : सहा वर्षे आणि साडेतीन वर्षांच्या दोन्ही मुलांना गल्लीत खेळायला जाण्यास सांगून, महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जयभवानीनगरात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना कृष्णा पाखरे (२६) असे मयत विवाहितेचे नाव आहे. कल्पना आणि कृष्णा यांचे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना ६ वर्षे आणि साडेतीन वर्षांची दोन मुले आहेत. घरगुती कारणावरून पती कृष्णा हा दारू पिऊन आणि इतर अनेक कारणांवरून कल्पना यांना मारहाण करून त्रास देत होता. सोमवारी रात्री त्यांच्यामध्ये रात्री २ वाजेपर्यंत भांडण सुरू होते. शेजाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडविले होते. आज सकाळी ९ वाजता पुन्हा त्यांच्यात भांडण सुरू झाले. या वेळी कल्पना यांना मारहाण करून कृष्णा घराबाहेर निघून गेला. काही वेळाने कल्पना यांनी दोन्ही मुलांना अंगणात खेळण्यासाठी जाण्यास सांगितले.
आईच्या सांगण्यावरून मुले समोर खेळण्यासाठी गेली. नंतर ते जवळच राहणाऱ्या आजीकडे गेले. घरी एकट्या असलेल्या कल्पना यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार नजरेस पडल्यावर कल्पना यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी कल्पना यांना तपासून मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार शिरसाट तपास करीत आहेत.