अनैतिक प्रेमसंबंधात पती होता अडसर; पत्नीने अन् तिच्या प्रियकरानेच काढला त्याचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:02 AM2021-05-26T04:02:16+5:302021-05-26T04:02:16+5:30
वैजापूर / गारज : अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नी अन् तिच्या प्रियकराने मिळून गळा आवळून खून केल्याची ...
वैजापूर / गारज : अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नी अन् तिच्या प्रियकराने मिळून गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना तपासात समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तपास चक्रे फिरवीत अवघ्या बारा तासात आरोपी काकासाहेब सर्जेराव कुटे (३५ रा. दरेगाव, ता. खुलताबाद) व नंदा आण्णा जाधव (रा. बाजारसावंगी) यांना अटक केली आहे.
बाजारसावंगी येथील तरुण आण्णा उत्तम जाधव (३५) यांचा मृतदेह वैजापूर तालुक्यातील गारज शिवारातील लोकविकास शुगर मिल्सच्या मोकळ्या मैदानावर सोमवारी आढळून आला. आण्णा याचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर जाधव यांच्या फिर्यादीवरून शिऊर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास दिला. गुन्हे शाखेने तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्रे फिरवीत अवघ्या बारा तासांच्या आत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींमध्ये मयत तरुणाची पत्नी व तिचा प्रियकर असून, यांच्या अनैतिक प्रेमसंबंधात तो अडसर ठरत होता.
पैसे आणायला जायचे म्हणून नेले सोबत
मयताची पत्नी नंदा जाधव व काकासाहेब कुटे या दोघांची मैत्री झाल्याने त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या दोघांच्या प्रेमसंबंधात आण्णा जाधव हा अडसर ठरू लागला. तो नेहमी दारू पिऊन नंदा हिला शिवीगाळ करत असे. तिच्यावर संशय घेऊन त्रास देत होता. त्यामुळे नंदा हिने त्याचा काटा काढायचा ठरवले. नंदा हिने प्रियकर काकासाहेब कुटे याला फोनवरून माझ्या नवऱ्याचा काटा काढावा लागेल, असे सांगितले. तिच्या सांगण्यावरून काकासाहेब याने मयत आण्णा याला रविवारी वैजापूरवरून पैसे आणायला जायचे आहे, असे सांगून गाडीवरून बसून नेले. वैजापूर तालुक्यातील गारज शिवारात आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या शुगर मिलच्या मैदानात काकासाहेब याने आण्णा जाधव याला दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच बेल्टने गळा आवळून त्याचा खून केला. अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळुंके, पोहेकाॅ. विक्रम देशमुख, विठ्ठल राख, दीपेश नागझरे, पोना. वाल्मिक निकम यांच्या पथकाने गुन्ह्याचा शोध लावला. याप्रकरणी अधिक तपास शिवूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख शेळके हे करीत आहेत.
फोटो :
१) आरोपी पत्नी नंदा जाधव
२) आरोपी काकासाहेब कुटे
250521\img-20210525-wa0142.jpg
गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक भागवत फुदे व पोलीस कर्मचारी पकडलला आरोपी दाखवताना