अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा दोन लाखांची सुपारी देऊन काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:04 AM2021-05-22T04:04:22+5:302021-05-22T04:04:22+5:30

औरंगाबाद : चुलत दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीमार्फत दोन लाख रुपयांची सुपारी देऊन काटा काढल्याची घटना ...

The husband who was an obstacle in an immoral relationship was given a betel nut worth Rs 2 lakh | अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा दोन लाखांची सुपारी देऊन काढला काटा

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा दोन लाखांची सुपारी देऊन काढला काटा

googlenewsNext

औरंगाबाद : चुलत दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीमार्फत दोन लाख रुपयांची सुपारी देऊन काटा काढल्याची घटना पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रूक येथे घडली. आरोपींनी मयताला सोमठाणादेवीच्या डोंगरावर नेऊन खून केला आणि त्याचे प्रेत थापटी तांडा शिवारात फेकून दिल्याचे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी मयताची पत्नी, मेहुणीसह सात आरोपींना पोलिसांनी अटक केली. अशोक बाबासाहेब जाधव (रा. कडेठाण बु.) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आरोपी पत्नी रंजना अशोक जाधव, चुलत भाऊ रामप्रसाद ऊर्फ बाळू शिवाजी जाधव, मेहुणी मीना मंसाराम पठाडे (४०, रा.करंजगाव), संतोष सारंगधर पवार(४०), कारभारी ऊर्फ बापू एकनाथ घोलप (२५,रा. बदनापूर), अरुण शिवाजी नागरे (३५,), प्रभाकर उर्फ शाम भिवसन तांबे (दोघे रा. अकोला निकळक, ता. बदनापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे म्हणाले की, २० मेच्या रात्री थापटी शिवारात अशोक जाधवचा मृतदेह सापडला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कॉल रेकॉर्डस आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अवघ्या काही तासांतच मारेकऱ्यांपर्यंत पोहोचले. आरोपी रंजनाचे तिचा चुलत दीर रामप्रसाद ऊर्फ बाळूसोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्या दोघांतील मोबाईलवरील संवाद कॉल रेकॉर्डिंग मयत अशोक यांनी ऐकल्यामुळे पती-पत्नीत महिनाभरापूर्वी भांडण झाले होते. पती भांडल्याचा रंजनाला राग आला होता. यामुळे रंजनाने तिची बहीण मीनाला फोन करून तू काहीही करून अशोकचा खून कर. शेतमाल आणि दागिने विकून तुला दोन लाख रुपये देते, असे सांगितले. यानंतर मीनाने गावातील संतोष पवार याला अशोकला मारण्याची सुपारी दिली. १७ हजार रुपये आगाऊ रक्कम दिली. यानंतर त्यांनी कट रचल्यानुसार मीनाने अशोकला फोन करून करंजगाव येथे १९ मे रोजी बोलावून घेतले. त्यांच्यातही अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध असल्यामुळे अशोक तिच्या घरी गेला. ठरल्याप्रमाणे मीना अशोकला घेऊन सोमठाणा देवीच्या डोंगरावर गेली. तेथे संतोष हा त्याचे साथीदार घोलप, नागरे आणि तांबे याच्यासह हजर होता. तेथे भांडण करून आरोपींनी अशोकचा गळा आवळून आणि हातपाय बांधून खून केला. यानंतर अशोकच्या दुचाकीवरून संतोषने मीनाबाईला गावात नेऊन सोडले. अशोकची दुचाकी एका ठिकाणी रस्त्यावर टाकून दिली. अन्य आरोपींनी कारमधून मयत अशोकचा मृतदेह थापटी शिवारातील रस्त्यालगत बेवारस अवस्थेत टाकून दिला. दुसऱ्या दिवशी रात्री मृतदेह आढळून आल्यावर अशोकचा मुलगा ज्ञानेश्वर याने पाचोड ठाण्यात खुनाची तक्रार नोंदविली. स्थानिक गुन्हे शाखेला या मृतदेहाविषयी माहिती मिळताच त्यांनी तपास करून अवघ्या २४ तासांत सात आरोपींना अटक केली.

==========

यांनी केली आरोपींना अटक

निरीक्षक फुंदे, फौजदार संदीप सोळंके, गणेश राऊत, कर्मचारी श्रीमंत भालेराव, धीरज जाधव, प्रमोद खांडेभराड, किरण गोरे,नामदेव सिरसाट,नरेंद्र खंदारे, संजय भोसले आदींनी या खुनाचा उलगडा केला.

Web Title: The husband who was an obstacle in an immoral relationship was given a betel nut worth Rs 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.