रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा- बायकोची उडाली झोप; संशयामुळे वैवाहिक आयुष्य पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 01:22 PM2022-07-07T13:22:10+5:302022-07-07T13:22:27+5:30
नवीन जोडप्यांमध्ये मोबाईलमुळेच होतोय सर्वाधिक कलह
- राम शिनगारे
औरंगाबाद : व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियामुळे नवरा- बायकोंमधील संवाद कमी होत आहे. सोशल मीडियावर शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींसोबत चॅटिंग केली जाते. त्यामुळे अनेकांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये ताणतणाव निर्माण झाला आहे. याविषयीच्या तक्रारींचा ओघच भरोसा सेलकडे दररोज येत आहे.
पती-पत्नीच्या वादाला मोबाइल हेच कारण
पती- पत्नीमधील बहुतांश वादाला मोबाइल हेच कारण बनले आहे. अनेक तक्रारींमध्ये पत्नी-पती सतत फोनवर बोलणे, सोशल मीडियावर चॅटिंग करण्यात वेळ घालवतात. त्यातून वाद होत आहेत.
सहा महिन्यांत शेकडो तक्ररी
भराेसा सेलकडे मागील सहा महिन्यांत मोबाइलवरून झालेल्या वादाच्या शेकडो तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींवर संबंधितांना एकत्रितपणे बोलावून घेत समुपदेशन करीत पुन्हा संसार जुळविण्याचे काम केल्याची माहिती निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दिली.
सोशल मीडियामुळे संवाद संपला
घरी येताच मोबाइल चेक : पती एका कंपनीत कामाला आहे. तो घरी येताच पत्नी पतीचा मोबाइल घेऊन चेक करते. दिवसभरात कोणाचे कॉल आले. कोणाशी चॅटिंग केली. याविषयी पाहणी केली जाते. त्यातून सतत खटके उडतात.
पती कंपनीत जाताच चॅटिंग : एका घटनेत पती नाईटला कंपनीत जाताच पत्नी झोपताना अंगावर पांघरूण घेऊन आतमध्ये व्हाॅट्सॲपवर मध्यरात्रीपर्यंत चॅटिंग करीत राहते. सासऱ्याने अनेकवेळा बघितल्यानंतर विचारणा झाली. तेव्हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला.
पतीने काढून घेतला मोबाइल : एका घटनेत पतीने पत्नीचा मोबाइल काढून घेतला. नातेवाइकांसह कोणालाही बोलायचे असेल तर स्वत:च्या मोबाइलवरूनच. त्यामुळे मोबाइल वाद भरोसा सेलपर्यंत पोहोचला.
रात्री मोबाइलपासून दूर राहिलेलेच बरे
घरी आल्यानंतर बेडवर झोपल्यावरही दोघे पती-पत्नी मोबाइललाच चिटकून असतात. त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होत आहे. त्यामुळे रात्री मोबाइलपासून दूर राहणेच कौटुंबिक स्वास्थ्यासाठी चांगले आहे.
एकमेकांना वेळ देणे हाच उपाय
पती-पत्नीने एकमेकांना वेळ देणे हाच वादावरील तोडगा आहे. सोशल मीडिया, फोनवर बोलण्यापासून दूर राहिले पाहिजे. त्याचा अतिवापर झाल्यास त्याचे दुष्परिणाम पती-पत्नीच्या नात्यावर होतात. हे टाळण्यासाठी वेळ दिला पाहिजे. विशेषकरून नवविवाहित दाम्पत्यांनी तर याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
- आम्रपाली तायडे, निरीक्षक, भरोसा सेल