वाळूज ग्रामपंचायतीत महिला सदस्यांचे पती व नातेवाईकांची लुडबुड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:04 AM2021-04-24T04:04:26+5:302021-04-24T04:04:26+5:30
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सदस्यांचे पती व नातेवाईकांची लुडबूड चांगलीच वाढली आहे. शुक्रवारी (दि. ...
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सदस्यांचे पती व नातेवाईकांची लुडबूड चांगलीच वाढली आहे. शुक्रवारी (दि. २३) झालेल्या मासिक बैठकीला बहुतांश महिला सदस्य या घरीच होत्या तर या सदस्यांचे पती व नातेवाईकांनी बेकायदेशीररित्या सभेला हजेरी लावली होती.
वाळूज ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकूण १७पैकी ९ जागी महिला सदस्य विजयी झाल्या आहेत. यात सरपंच सईदाबी पठाण या दोन प्रभागांतून विजयी झाल्याने त्यांनी एका प्रभागाचा राजीनामा दिलेला आहे. शुक्रवारी वाळूज ग्रामपंचायतीतर्फे मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मासिक सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सईदाबी पठाण तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे आदींची उपस्थिती होती. या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, राहुल भालेराव, पोपट बनकर, फैय्याज कुरैशी यांच्यासह महिला सदस्यांचे पती व नातेवाईकांनी हजेरी लावली होती.
महिला सदस्यांना डावलून नियमबाह्यपणे ग्रामपंचायतीच्या कारभारात ढवळाढवळ करणारे त्यांचे पती व नातेवाईकांविरुध्द कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांमधून केली जात आहे.
-------------------------