प्रियकराच्या मदतीने पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:43 PM2018-01-07T23:43:34+5:302018-01-07T23:43:55+5:30
अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून करुन एकघर पाडळी (ता. फुलंब्री) शिवारात मक्याच्या गंजीवर टाकून देऊन पुरावा नष्ट केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. १२ दिवसांत पिशोर पोलीस व ‘स्थागुशा’ने या प्रकरणाचा उलगडा केला. देवमन विठ्ठल सोनवणे (४५, रा. निंभोरा, ता. कन्नड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिशोर : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून करुन एकघर पाडळी (ता. फुलंब्री) शिवारात मक्याच्या गंजीवर टाकून देऊन पुरावा नष्ट केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. १२ दिवसांत पिशोर पोलीस व ‘स्थागुशा’ने या प्रकरणाचा उलगडा केला. देवमन विठ्ठल सोनवणे (४५, रा. निंभोरा, ता. कन्नड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पिशोर ठाण्याचे सपोनि. अभिजीत मोरे यांनी सांगितले की, फुलंब्री तालुक्यातील एकघर पाडळी येथे २५ डिसेंबर रोजी पिशोर रस्त्यालगत गट नं.५५ मध्ये मकाच्या गंजीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शी कुणीतरी खून करुन प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मयत व्यक्तीच्या अंगावरील लाचकण्ड, अंगठ्या, पांढरी कवडी, चाव्या, अंडरवेअर आदी पोलिसांनी हस्तगत करुन तपास सुरु केला. दरम्यान, ‘स्थागुशा’चे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सपोनि. अभिजीत मोरे, सायबरसेलचे पोउनि. विकास हजारे आदींनी तपासचक्रे फिरविली. ३ जानेवारी रोजी कन्नड तालुक्यातील निंभोरा येथील देवमन विठ्ठल सोनवणे हे २५ डिसेंबरपासून बेपत्ता असल्याबाबत पिशोर पोलिस ठाण्यास तक्रार प्राप्त झाली. पती देवमन सोनवणे हे बेपत्ता असल्याबाबत पत्नीने उशिरा तक्रार दिल्याने पोलिसांना संशय आला. उपनिरीक्षक जयराज भटकर, जमादार संजय देवरे, पोना. सुनील ढेरे, किसन गवळी, देवकर यांनी गोपनीय माहिती काढली.
पिशोर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, देवमन सोनवणे यांच्या पत्नीचे पंडित कायंदे नामक व्यक्तिशी अनैतिक संबंध होते. या संबंधात पती अडसर ठरत असल्याने या दोघांनी आधीपासून मारण्याचा कट रचला होता. पिशोर पोलिस ठाण्यात पंडित कायंदे, गणेश शिंदे तसेच मयताची पत्नी मीराबाई सोनवणे यांच्याविरुद्ध कलम ३०२, २०१, १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचे सपोनि मोरे. यांनी सांगितले.
ठरल्याप्रमाणे २४ डिसेंबर रोजी रात्री देवमण हे घरासमोर झोपलेले असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास पंडित कायंदे याने गणेश शिंदे (रा.जांभई, ता. सिल्लोड ह.मु. गुलमोहर कॉलनी, औरंगाबाद) याच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केला. देवमण यांचा मृत्यू झाल्याची खात्री होताच मृतदेह पोत्यात टाकून दुचाकीवरुन एकघर पाडळी शिवारात नेऊन पहाटे दोन वाजेदरम्यान मक्याच्या गंजीत टाकून पेटवून देऊन पोबारा केला. पिशोर पोलिसांनी पंडित कायंदे याला तर गणेश शिंदे याला ‘स्थागुशा’च्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. ‘स्थागुशा’चे उपनिरीक्षक सचिन कापुरे, जमादार मुळे, राख, देशमुख, पोना. शेख नदीम, पोकॉ. बाबा नवले, बकले आदींसह सायबर सेलचे रवींद्र लोखंडे, योगेश तरमळे, जीवन घोलप, योगेश दारवंटे, गजानन बनसोड आदींनी तपासकामी मदत केली.ं