खून करून स्वत:च्या घरातच पुरले पतीचे प्रेत

By Admin | Published: June 3, 2016 11:42 PM2016-06-03T23:42:55+5:302016-06-03T23:54:43+5:30

औरंगाबाद : पत्नीने पतीला जेवणातून गुंगीचे औषध दिले व त्याची शुद्ध हरपल्यानंतर खून केला आणि मग चक्क आपल्या दुसऱ्या घरातच पतीचे प्रेत नेऊन पुरले.

Husband's body buried in his own house | खून करून स्वत:च्या घरातच पुरले पतीचे प्रेत

खून करून स्वत:च्या घरातच पुरले पतीचे प्रेत

googlenewsNext

औरंगाबाद : पत्नीने पतीला जेवणातून गुंगीचे औषध दिले व त्याची शुद्ध हरपल्यानंतर खून केला आणि मग चक्क आपल्या दुसऱ्या घरातच पतीचे प्रेत नेऊन पुरले. चिकलठाणा शिवारातील जालना रोड व बीड बायपासला जोडणाऱ्या जुन्या रोडवरील नवपुते वस्तीच्या बाजूला घडलेला हा धक्कादायक प्रकार दहा दिवसांनंतर शुक्रवारी उघडकीस आला.
विलास दादाराव आव्हाड (४०), रा. राजनगर, मुकुंदवाडी स्टेशन परिसर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी संगीता (३६) ही पसार झाली आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मयत विलास हा राजनगरात पत्नी संगीता, मुलगा किशोर, सून सुरेखा, अन्य एक मुलगा व मुलीसोबत राहत होता. त्यांची आई शांताबाई ही भारतनगरात वेगळी राहते. विलास आव्हाड हा मोलमजुरी करून उपजीविका भागवीत होता.
शोध घेण्याचे केले नाटक...
विलास हा गेल्या दहा दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. चार दिवसांपूर्वी विलासची पत्नी संगीता ही भारतनगरात सासूकडे आली आणि ‘तुमचा मुलगा मोटारसायकल घेऊन घरातून गेला. चार- पाच दिवस उलटले तरी परत आलेला नाही. चला, आपण त्याचा शोध घेऊ’ असे संगीताने सांगितले. मग पती विलासच्या शोधार्थ संगीता शांताबाईला घेऊन अनेक ठिकाणी फिरली. तो मजुरी करीत असल्याने शहरातील प्रत्येक कामगार नाक्यावर ती शांताबाईला घेऊन गेली. प्रत्येक ठिकाणी ‘तो’ चार- पाच दिवसांनी दिसलाच नाही, असे सांगण्यात आले. मुलगा बेपत्ता असल्याने आई शांताबाई हवालदिल झाली होती; परंतु पत्नी संगीताच्या चेहऱ्यावर तसा काही लवलेश दिसून येत नव्हता. त्यामुळे काही तरी काळेबेरे आहे, याची चाहूल शांताबाईला लागली होती.

नातसुनेमुळे फुटले बिंग
इकडे मुलगा विलासच्या शोधार्थ जंग जंग पछाडत असतानाच बुधवारी रात्री आई शांताबाईला तिची नातसून सुरेखाचा फोन आला. सुरेखाने फोन आपल्या आईकडे दिला. सुरेखाच्या आईने ‘बाई तुम्ही तातडीने आमच्या गावी या, तुम्हाला काही तरी सांगावयाचे आहे’ असे म्हटले. त्यावर शांताबाईने आमचा विलास तिकडे आला आहे का? अशी विचारणा केली. ‘तुम्ही या तर, ते आहेत’ असे सांगण्यात आले. आपला मुलगा सुनेच्या घरी सुखरूप असल्याचे समजताच शांताबाईला दिलासा मिळाला.
तातडीने बुधवारी सकाळी ती नातसुनेच्या गावी सिंदखेडराजाला पोहोचली. या तिघींची भेट झाली. तेव्हा नातसुनेच्या आईने ‘बाई काळजावर दगड ठेवून ऐका, तुमचा मुलगा आता या जगात नाही. त्याचा खून झाला’ असे सांगितले. विशेष म्हणजे मुलगा विलासचा खून त्याची पत्नी म्हणजेच आपली सासू संगीतानेच केला, हे नातसुनेने सांगितले. खून करून प्रेत चिकलठाणा शिवारात संगीताने घरात कुणालाही न सांगता पुरून ठेवले, असेही नातसुनेने सांगितले.

आईची पोलीस ठाण्यात धाव
आपल्या मुलाचा खून झाल्याचे समजताच शांताबाईने नातसुनेला ‘तू पोलिसांसमोर सगळे सांगशील ना’ असे विचारले. तिने होकार देताच शांताबाईने सरळ रेल्वेने औरंगाबाद गाठले. औरंगाबादेत उतरताच शुक्रवारी दुपारी मुकुंदवाडी ठाण्यात येऊन तिने आपला मुलगा दहा दिवसांपासून बेपत्ता असून, त्याची पत्नी संगीतानेच त्याचा खून करून प्रेत चिकलठाण्यात नेऊन पुरल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नाथा जाधव, फौजदार कल्याण शेळके यांनी शांताबाईला घेऊन आधी विलासचे राजनगरमधील घर गाठले. तेव्हा घरातून विलासची पत्नाी संगीता आणि मोठा मुलगा किशोर गायब असल्याचे समजले.
मग पोलिसांनी खबऱ्यांकडून माहिती काढली. तेव्हा दहा दिवसांपूर्वी संगीता ही रात्री जवळच राहणारा रिक्षाचालक महेश मोहाडकर याच्या रिक्षात विलासला घेऊन गेली होती, असे समोर आले. शोध घेऊन पोलिसांनी रिक्षाचालक महेशला ताब्यात घेतले अन् सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.
आधी जेवणातून दिले गुंगीचे औषध
आतापर्यंतच्या प्राथमिक तपासानुसार पती विलासला संपविण्याचा संगीताने निश्चय केल्यानंतर ‘त्या’ रात्री स्वयंपाक करताना भाजीतच संगीताने गुंगीचे औषध टाकले. विशेष म्हणजे हे सूनबाई सुरेखाच्या लक्षात आले. तिने ‘सासूबाई हे काय टाकताय’ अशी विचारणाही केली. त्यावर काही नाही मसाला आहे, असे सांगून संगीताने वेळ मारून नेली. नंतर ही भाजी विलासला खाऊ घातली. विशेष म्हणजे ‘आज आम्ही दोघे बाहेर अंगणात झोपतो, असे म्हणून संगीता पतीला बाहेर झोपण्यासाठी घेऊन आली. विलासला गुंगी आल्यानंतर तिने जवळच राहणारा रिक्षाचालक महेशला बोलावले आणि ‘आम्हाला चिकलठाण्यात नणंदेच्या घरी सोड, शंभर रुपये देते’ असे सांगितले. त्यानुसार आपण मित्र गोविंदला सोबत घेतले आणि मग संगीता व तिचा पती विलासला चिकलठाणा शिवारातील ‘त्या’ वस्तीवर रात्री नेऊन सोडल्याचे रिक्षाचालक महेशने पोलिसांना सांगितले.
रिक्षातून उतरल्यानंतर संगीता विलासला घेऊन अंधारात निघून गेली आणि मी व मित्र गोविंद परत घरी निघून आलो, असेही रिक्षाचालकाने जबाबात म्हटले. रिक्षाचालक गेल्यानंतर संगीताने आपल्या ‘त्या’ पत्र्याचे शेड असलेल्या घरात नेऊन पती विलासच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आणि नंतर तेथे खड्डे खोदून प्रेत मुरुमात पुरले, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
खुनाचे कारण गुलदस्त्यात
घटनेचा उलगडा झाल्यानंतर शुक्रवारी रात्री उपायुक्त राहुल श्रीरामे, निरीक्षक नाथा जाधव, फौजदार कल्याण शेळके यांच्या उपस्थितीत विलासचे प्रेत बाहेर काढण्यात आले. त्याचा पंचनामा आणि शवविच्छेदन करण्यात आले. प्रेताचा नुसता सांगाडाच शिल्लक होता. तीन दिवसांपासून विलासची पत्नी संगीता आणि मोठा मुलगा किशोर बेपत्ता झाले आहेत.
ते सापडल्यानंतरच खुनाचे कारण समोर येईल, असे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्याठिकाणी हे प्रेत पुरण्यात आले होते, ती जागा संगीताने गुपचूप खरेदी केली होती. घरात याबाबत कुणालाही माहिती नव्हती, हे विशेष.
हात दिसल्याने सुनेला समजला प्रकार!
विलासचा खून केल्यानंतर संगीता घरी आली. सकाळीच तिने मुलगा किशोर आणि सून सुरेखाला ‘चला, आपल्याला नव्या घरात मुरूम पसरायचा आहे, असे सांगत दोघांना घेऊन ती ‘त्या’ शेडवर आली. तिघांनी मुरूम पसरविण्यास सुरुवात केली. ढिगारात पुरलेल्या विलासच्या प्रेताचा हात सून सुरेखाच्या नजरेस पडला. संगीता चूप बस, म्हणत मुरूम पसरवून कुलूप ठोकून तेथून निघून आली. तो हात सासऱ्याचाच आहे. सासूने खूनकेला आणि प्रेत तेथे पुरले, याची सुरेखाला चाहूल लागली. भीतीपोटी गुपचूप त्याच दिवशी सुरेखाने माहेर गाठले आणि आपल्या आईला प्रकार सांगितला.

Web Title: Husband's body buried in his own house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.