प्रेमविवाहानंतर जर्मनीत जाताच पतीची नियत फिरली;पत्नीच्या हत्येचा प्रयत्न,एकटीला सोडून पळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 12:28 PM2022-04-01T12:28:09+5:302022-04-01T12:29:54+5:30

दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर मुलीच्या आई-वडिलांनी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करून २८ जून २०१८ रोजी धुमधडाक्यात लग्न लावून दिले.

Husband's destiny changed as soon as he went to Germany after love marriage; attempted murder of wife, left alone and fled | प्रेमविवाहानंतर जर्मनीत जाताच पतीची नियत फिरली;पत्नीच्या हत्येचा प्रयत्न,एकटीला सोडून पळाला

प्रेमविवाहानंतर जर्मनीत जाताच पतीची नियत फिरली;पत्नीच्या हत्येचा प्रयत्न,एकटीला सोडून पळाला

googlenewsNext

औरंगाबाद : महाविद्यालयीन शिक्षण घेताना दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात अन् नंतर विवाहात झाले. ती जर्मनीत पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी जाताना तिच्या नावावर कर्ज घेऊन पाठवणी केली. तिचा पतीही काही दिवसातच जर्मनीत शिक्षण घेण्यासाठी गेला. त्या ठिकाणी काही दिवस एकत्र राहिल्यानंतर त्याने तिला मारहाण, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ऐन कोराेनाच्या काळात हा प्रकार घडला. यातच तो एप्रिल २०२१ रोजी तिला सोडून दुसऱ्याच शहरात निघून गेला. त्यानंतर परतलाच नाही. तिने भारतात आल्यानंतर जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

आरोपींमध्ये पती वैभव अनिल राजकारणे, सासरा अनिल मोरेश्वर राजकारणे (रा. एन ५, सावरकरनगर) आणि एका महिलेचा समावेश आहे. जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलगी बी.टेक. आणि मुलगा मेकॅनिकल अभियांत्रिकीत पदवीचे शिक्षण घेताना दोघात मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले. दोघांनीही आयुष्यभराची साथ निभावण्याचा निर्णय घेत कुटुंबीयांना तसे सांगितले. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर मुलीच्या आई-वडिलांनी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करून २८ जून २०१८ रोजी धुमधडाक्यात लग्न लावून दिले. लग्नानंतर काही दिवसातच नवरा, सासू आणि सासऱ्याने तिचा छळ सुरू केला. हा छळ सुरू असतानाच तिला पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी जर्मनीतील फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फायनान्स ॲण्ड मॅनेजमेंटमध्ये संधी मिळाली. त्यासाठी सासऱ्याने तिचे जबरदस्तीने बँक डिटेल्स, स्टेटमेंट घेऊन शिक्षणासाठी ३३ लाख रुपये कर्ज काढले. कर्ज घेऊन ती १५ सप्टेंबर २०१८ रोजी उच्च शिक्षणासाठी जर्मनीत गेली. त्यानंतर काही दिवसातच पती वैभव हा सुद्धा शिक्षणासाठी जर्मनीत गेला. जानेवारी २०१९ मध्ये पत्नीला भेटला. त्यावेळी त्याला पत्नीने कौटुंबिक जबाबदारी घेण्याची विनंती केली. तेव्हा वैभवने पत्नीला तोंड फुटेपर्यंत मारहाण केली.

यानंतर एप्रिल व जून २०१९ मध्ये पुन्हा पत्नीला भेटला. तेव्हाही मारहाण करून निघून गेला. जुलै २०२० मध्ये दोघेही फ्रँकफर्ट येथे एकत्र राहू लागले. तिने खर्च भागविण्यासाठी शिक्षण घेतानाच तात्पुरती नोकरी सुरू केली. त्यातून घरभाडे आणि दोघांचा खर्च भागत होता. डिसेंबर २०२० मध्ये वैभवच्या व्हिसाची मुदत संपत असल्यामुळे, नूतनीकरणासाठी सहा हजार युरो (पाच लाख रु.) खर्च येणार होता. तो माहेरी पैसे मागण्यासाठी जबरदस्ती करीत होता. तिने नकार देताच बेदम मारहाण केली. त्याविषयी सासू, सासऱ्यांना कळविले असता, त्यांनीही मुलाचीच बाजू घेत सुनेला शिवीगाळ केली. यानंतर एप्रिल २०२१ मध्ये वैभव पत्नीला सोडून जर्मनीतील दुसऱ्याच शहरात राहण्यास गेला. त्याचा शोध घेतला, मात्र तो अद्यापपर्यंत सापडलाच नाही. त्याने पत्नीशी संबंध तोडून टाकले. सप्टेंबर २०२१ मध्ये ती भारतात परतली. औरंगाबादेत आल्यानंतर सासू-सासऱ्यांनी घरी येऊ दिले नसल्यामुळे माहेरी गेली. सासरी विनंती करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तिने अखेर जिन्सी पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याच्या विरोधात तक्रार नोंदविली.

तीनवेळा गळा दाबण्याचा प्रयत्न
जर्मनीत असताना वैभवने पत्नीचा तीनवेळा झोपेत असताना गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचे तिच्या माहेरच्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्याशिवाय उच्चशिक्षित मुलीला सतत टोमणे, शिवीगाळ करण्यात येत असल्यामुळे तिचे मानसिक खच्चीकरणही झाल्याचे त्यांनी सांगितले. सासू, सासऱ्यांनी तिचे दागिनेही घेतले. अधिक तपास उपनिरीक्षक अनंता तांगडे करीत आहेत.

Web Title: Husband's destiny changed as soon as he went to Germany after love marriage; attempted murder of wife, left alone and fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.