पत्नीचा जाळून खून केल्याच्या आरोपाखाली पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:11 PM2019-03-19T23:11:18+5:302019-03-19T23:11:43+5:30
मद्यपानाचा जाब विचारल्यामुळे पत्नीचा जाळून खून करणारा तिचा पती राजू रघुनाथ दाभाडे (३५, रा. घारेगाव एकतुनी, ता. जि. औरंगाबाद) याला सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी मंगळवारी (दि. १९) जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : मद्यपानाचा जाब विचारल्यामुळे पत्नीचा जाळून खून करणारा तिचा पती राजू रघुनाथ दाभाडे (३५, रा. घारेगाव एकतुनी, ता. जि. औरंगाबाद) याला सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी मंगळवारी (दि. १९) जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला.
सुनीता राजू दाभाडे (२६ , रा. घारेगाव एकतुनी, ता. जि. औरंगाबाद) हिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या मृत्यूपूर्व जबाबानुसार, आरोपी राजू याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यावरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असत. २५ मार्च २०१७ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास राजू दारू पिऊन घरी आला. त्याला पत्नीने दारू पिल्याचा जाब विचारताच त्याने रागाच्या भरात तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. तिने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने तसेच शेजाऱ्यांनी तिला विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ती ४५ टक्के भाजली होती. त्यानंतर तिला घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
पोलीस नाईक एस. बी. पाटील यांनी सुनीताचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला. त्यावरून राजू विरुद्ध प्रथम भादंविच्या कलम ३०७ कलमांन्वये करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान १८ एप्रिल २०१७ रोजी तिचा मृत्यू झाल्यानंतर ३०२ कलमाचा समावेश करण्यात आला होता.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील शरद बांगर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात मृत सुनीताची आई व पोलीस नाईक पाटील यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला. गुन्हा घडल्यापासून आरोपी अटकेत होता.