पतीनेच कु-हाडीने छाटले पत्नीचे मुंडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:53 AM2018-08-17T00:53:09+5:302018-08-17T00:53:38+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पतीने झोपेत कु-हाडीने पत्नीचे मुंडके छाटल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी (दि.१४) रात्री घडली.
सिल्लोड/आमठाणा (औरंगाबाद) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने झोपेत कु-हाडीने पत्नीचे मुंडके छाटल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी (दि.१४) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध खून व भादंवि कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती मात्र, फरार झाला असून सासू, सासरा व दीर, जाऊ या चौघांना अटक करण्यात आली आहे.
ठार झालेल्या महिलेचे नाव मंगलाबाई रवींद्र बनकर (३०, रा. देऊळगाव बाजार, ता. सिल्लोड) असे आहे, तर खून करणाऱ्या पतीचे नाव रवींद्र साहेबराव बनकर (३०, रा. देऊळगाव बाजार) असे आहे. याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील सूर्यभान किसन सुसुंद्रे (रा. दीडगाव) यांच्या तक्रारीवरून पती रवींद्र बनकर, सासरा साहेबराव रामराव बनकर, सासू लंकाबाई साहेबराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर, जाऊ शीतल अशोक बनकर (सर्व रा. देऊळगाव बाजार) यांच्याविरुद्ध खून व भादंवि कलम ४९८ अन्वये सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सासरा साहेबराव, दीर अशोक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पती मात्र, फरार झाला असून रात्री उशीरा सासू, व जाऊला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, नको त्या स्थितीत पत्नीला पतीने अनेकदा बघितले होते. यानंतर समजूत घातल्यावरसुद्धा सुधारणा झाली नाही. यामुळे पती रवींद्र बनकर याने मंगळवारी रात्री २ वाजता झोपेतच पत्नीच्या मानेवर कु-हाडीने वार करून मुंडके धडावेगळे केले. यानंतर तो प्रेत जागेवरच सोडून फरार झाला. घटनेची माहिती गावात पोहोचताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व गुन्ह्यात वापरलेली कु-हाड जप्त केली.
दरम्यान, लग्नात भांडे व हुंडा दिला नाही म्हणून सासरची मंडळी तिला नेहमी त्रास देत होती. तसेच माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करून तिचा छळ करण्यात येत होता. आता तिच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या मंडळीने मुलीचा खून केल्याची तक्रार मयत विवाहितेच्या वडिलांनी दिली आहे. सध्या खून नेमका कोणत्या कारणाने केला याचा तपाास पोलीस करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. विश्वास पाटील, पोउनि. सावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. खबरदारी म्हणून देऊळगाव बाजार येथे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अन् क्लिप केली व्हायरल
आरोपी पती रवींद्रे याने तिचे दुस-यासोबत संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी खून करण्यापूर्वी एका मित्राच्या साहाय्याने मंगलाबाईशी फोनवर कॉन्फरन्सद्वारे संभाषण करून कुणासोबत अनैतिक संबंध आहे. याची कबुली करून घेतली. त्यानतर संभाषणाची क्लिप काही ग्रुपवर मंगळवारी रात्री १२ वाजता व्हायरल केली. यानंतर आरोपीचे पत्नीचा खून केला.
त्यानंतरच केले विवाहितेवर अत्यसंस्कार
जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी त्वरित २ आरोपींना अटक करून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले. यानंतर बुधवारी सायंकाळी सदर विवाहितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.