हुश्श! हनुमान टेकडीचा नवीन जलकुंभ सेवेत; हिमायतबाग, टीव्ही सेंटर जलकुंभही पूर्णत्वाकडे

By मुजीब देवणीकर | Published: December 5, 2023 12:11 PM2023-12-05T12:11:20+5:302023-12-05T12:12:46+5:30

नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरात एकूण ५२ जलकुंभ बांधण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ११ जलकुंभ प्राधान्याने बांधून देण्याची मागणी महापालिकेने केली होती.

Hush! Hanuman Hill's new water tank in service; Himayat Bagh, TV Center Jalakumbh also nearing completion | हुश्श! हनुमान टेकडीचा नवीन जलकुंभ सेवेत; हिमायतबाग, टीव्ही सेंटर जलकुंभही पूर्णत्वाकडे

हुश्श! हनुमान टेकडीचा नवीन जलकुंभ सेवेत; हिमायतबाग, टीव्ही सेंटर जलकुंभही पूर्णत्वाकडे

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेकडे पाणी साठवणुकीसाठी जलकुंभ नसल्याची ओरड अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही ओरड आता हळूहळू संपेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नवीन पाणीपुरवठा योजनेत बांधलेला हनुमान टेकडी येथील जलकुंभ वापरण्याची परवानगी दिली आहे. हिमायतबाग, टीव्ही सेंटर येथील जलकुंभदेखील पुढील आठवड्यापासून वापरात आणले जाणार आहेत. शहराच्या पाणीपुरवठा विभागाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरात एकूण ५२ जलकुंभ बांधण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ११ जलकुंभ प्राधान्याने बांधून देण्याची मागणी महापालिकेने केली होती. विभागीय आयुक्त, मनपा प्रशासक, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी वारंवार आढावा बैठकीत जलकुंभ त्वरित पूर्ण करून मनपाकडे द्या, असा आग्रह धरला होता.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले की, हनुमान टेकडी येथील जलकुंभाचे टेस्टिंग काही दिवसांपूर्वी करण्यात आली. सोमवारी हा जलकुंभ सुरू करण्यात आला. जलकुंभ यशस्वी झाला, त्यामुळे महापालिकेला हा जलकुंभ लगेचच वापरता येईल. जलकुंभ सुरू करण्यासाठी जीवन प्राधिकरणचे प्रमुख अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. हिमायतबाग, टीव्ही सेंटर येथील जलकुंभाचे कामदेखील संपले असून, हा जलकुंभदेखील आठवडाभरात वापरात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टीव्ही सेंटर येथे आणखी आऊटलेट तयार करून त्याला पाइप जोडण्याचे काम केले जाणार आहे. दिल्लीगेट येथील जलकुंभासाठी वेळ लागेल, असा उल्लेख त्यांनी केला.

खंडपीठ व पाणीपुरवठा 
नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण होऊन शहरवासीयांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, यावर खंडपीठ देखरेख करत आहे. हे जलकुंभ लवकर पूर्ण करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते.

हे चार जलकुंभ शहराला मिळणार
जलकुंभ- क्षमता-             लोकसंख्या

हनुमान टेकडी- २१.३५ लाख लिटर्स- - २२,९२८
टीव्ही सेंटर- १६.५५----------- - २१,८८२
हिमायतबाग- ३७.०९--------- -४१, २५०
दिल्लीगेट- ३०.०७----------- -४३,३५२

Web Title: Hush! Hanuman Hill's new water tank in service; Himayat Bagh, TV Center Jalakumbh also nearing completion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.