हुश्श... पाचव्या दिवशी जलवाहिनी सुरू; शहराच्या पाण्यात २० एमएलडी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:21 IST2024-08-29T18:18:32+5:302024-08-29T18:21:30+5:30
काही दिवसात पाणीपुरवठ्याची परिस्थिती पूर्वपदावर येईल: मनपा

हुश्श... पाचव्या दिवशी जलवाहिनी सुरू; शहराच्या पाण्यात २० एमएलडी वाढ
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे टाकण्यात आलेल्या नवीन ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा जोड निखळल्याने शनिवारपासून ती बंद होती. बुधवारी सकाळी ६ वाजता जलवाहिनी सुरू केली. नक्षत्रवाडी येथे ११:२५ वाजता पाणी आले. जलवाहिनी सुरू झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात २० एमएलडीने वाढ झाली. पुढील काही दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास मनपा पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला.
शनिवारी सकाळी ९ वाजता ढोरकीन येथे जलवाहिनीचे जॉईंट निखळले. ते दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कंत्राटदाराने तब्बल चार दिवस लावले. बुधवारी सकाळी ६ वाजता जायकवाडी येथून जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येण्यासाठी तीन तास लागले. त्यानंतर पाण्यावर प्रक्रिया करून दोन तासांत नक्षत्रवाडी येथील डोंगरावरील एमबीआरमध्ये पाणी घेण्यात आले. तेथून पाणी सिडको-हडकोसह शहराला देण्यात आले.
याबाबत मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले की, जलवाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर बुधवारी सकाळी पाणी उपसा सुरू करण्यात आला. सकाळी ११:२५ वाजता नक्षत्रवाडीत पाणी आले. काही दिवसात पाणीपुरवठ्याची परिस्थिती पूर्वपदावर येईल.