हुश्श ! आयसीयूतून पलायन केलेला रुग्ण सापडला; ११ तासांनी पुन्हा घाटीत भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:00 PM2020-06-09T23:00:35+5:302020-06-09T23:05:01+5:30
पहाटे रुग्णांने परिचारीका, कर्मचारी, डाॅक्टर कामात असतांना वाॅर्डातून पलायन केले.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेला गणेशनगर येथील ३८ वर्षीय रुग्णाने वाॅर्डातील डॉक्टर, परिचारीका सुरक्षा रक्षकांना चमका देत पळ काळला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी पाऊणे सातच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीसांत तक्रारही केली होती. दरम्यान, पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क केला. रुग्ण घरी असल्याचे कळताच एमएसएफच्या जवानांनी १०८ रुग्णवाहीकेतून रुग्णाला घरुन पुन्हा घाटीत आणले. त्याला वार्ड पाच मध्ये भरती केल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली.
रविवारी (दि. ७) गणेशनगर येथील ३८ वर्षीय व्यक्तीला भरती करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याच्यावर डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणजेच मेडीसीन इमारतीच्या आयसीयूत उपचार सुरु होते. श्वासनचा त्रास जाणवत असल्याने त्यांना आॅक्सीजन लावण्यात आलेला होता. मंगळवारी पहाटे रुग्णांने परिचारीका, कर्मचारी, डाॅक्टर कामात असतांना वाॅर्डातून पलायन केले. विषेश म्हणजे या इमारतीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांनाही चकमा दिला. सकाळच्या फेरीतील औषधी देतांना रुग्ण वॉर्डात नसल्याचे लक्षात आल्यावर शोधाशोध झाली.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रुग्ण घरी असल्याचे कळाल्यावर सुरक्षा रक्षकांनी १०८ रुग्णवाहीका घरी घेवून जात रुग्णाला घेवून आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना वाॅर्ड ५ मध्ये भरती करुन उपचार सुरु करण्यात आल्याचे डॉ. हरबडे यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांची काॅन्टक्ट ट्रेसिंग सुरुच आहे. तो रुग्ण कुणाच्या संपर्कात आला याचा शोध घेवून त्यांचीही तपासणी करण्यात येईल असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.