हुश्श... पैठण तालुक्यातील त्या मृत पक्ष्यांना बर्ड फ्लू नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:02 AM2021-01-22T04:02:57+5:302021-01-22T04:02:57+5:30
--- औरंगाबाद : वाघुंडी (ता. पैठण) येथील बुट्टेवारी शिवारातील भाऊसाहेब शिंदे आणि हिरडपुरी येथील गणेश गरुळे यांच्या शेतात कोंबड्या ...
---
औरंगाबाद : वाघुंडी (ता. पैठण) येथील बुट्टेवारी शिवारातील भाऊसाहेब शिंदे आणि हिरडपुरी येथील गणेश गरुळे यांच्या शेतात कोंबड्या दगावल्या होत्या. अज्ञान रोगाने दगावलेल्या या पक्ष्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाच्या शीघ्र कृती दलाने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यांचा अहवाल बर्ड फ्लूसाठी निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुरेखा माने यांनी दिली.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक अधिनियम २००९ नुसार या गावाच्या १० किलोमीटरपर्यंतच्या गावांत सतर्क क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी १६ जानेवारीला घोषित केले होते. पक्ष्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यानंतर या परिसरात पुन्हा पक्षी दगावले नसल्याने आमडापुर व हिरडपुरी परिसरात घोषित अलर्ट झोन जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. प्रशांत चौधरी यांनी दिली. हिमायतबाग परिसरात दगावलेल्या किंगफिशरचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तो अहवाल वन्यजीव विभागाकडून यायला आणखी वेळ लागणार असल्याचे चौधरी म्हणाले.