हुश्श्य...९ महिन्यांनंतर ‘सिव्हिल’ झाले रिकामे; कोरोनाचा एकही रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 02:00 PM2021-01-07T14:00:27+5:302021-01-07T14:00:54+5:30
coronavirus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात झाले.
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल ‘ब्रिटन रिटर्न’ तरुणाचा दुसरा अहवालही बुधवारी निगेटिव्ह आला. दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्णालयातच गेल्या ९ महिन्यांत प्रथमच एकही कोरोना रुग्ण दाखल नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात झाले. गेल्या ९ महिन्यांपासून याठिकाणी केवळ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. नव्या स्ट्रेनच्या रुग्णांवरही याठिकाणी उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इंग्लंडहून आलेला एक २९ वर्षीय तरुणही काेरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. या तरुणावर २७ डिसेंबरपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या तरुणाचा सोमवारी तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या स्वॅब घेण्यात आला आणि त्याचा अहवालही निगेटिव्ह आल्याने त्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने काहीसा सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.
ओपीडी सुरू होण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा रुग्णालयात मार्चपासून केवळ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. लसीकरणाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. २६ जानेवारीपासून सुरु होण्याची शक्यता आहे.