हुश्श...जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण, जुन्या शहराचा पाणीपुरवठा २९ तास बंद

By मुजीब देवणीकर | Published: August 30, 2023 11:37 AM2023-08-30T11:37:24+5:302023-08-30T11:40:12+5:30

जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाली.

Hush...water pipeline repair complete, water supply to old city off for 29 hours | हुश्श...जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण, जुन्या शहराचा पाणीपुरवठा २९ तास बंद

हुश्श...जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण, जुन्या शहराचा पाणीपुरवठा २९ तास बंद

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहराची तहान भागविणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी सोमवारी दुपारी जायकवाडी गावाजवळ फुटली होती. दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल २९ तास लागले. मंगळवारी सायंकाळी ५:५० वाजता काम पूर्ण झाले. त्यानंतर शहरात पाणी आणण्यास सुरुवात झाली. दीड दिवसाच्या खंडामुळे जुन्या शहरातील पाणीपुरवठा एक ते दोन दिवस पुढे ढकलण्यात आला.

शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होतोय. प्रत्येक वेळेस एक नवीन कारण देण्यात येते. पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून नागरिकांना सात ते आठ दिवसांनी एकदा पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत चालला आहे. सोमवारी जायकवाडी गावाजवळ ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदाराकडून जलवाहिनी फुटली होती. प्राधिकरणाच्या कंत्राटदाराने दुरुस्तीची जबाबदारी घेतली. सोमवारी दुपारी १ वाजता फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यास तब्बल २९ तास लागले. मंगळवारी सायंकाळी ५:५० वाजता शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला.

१४०० जलवाहिनीतून शहराला पाणी
सिडको-हडकोसह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला दोन दिवस मोठी कसरत करीत अनेक वसाहतींची तहान भागवावी लागली. अनेक वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला.

जुन्या शहरात निर्जळी
सोमवारी जुन्या शहराचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे दुपारनंतर दिले जाणारे पाण्याचे टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले. मंगळवारी काही टप्पे पूर्ण करून उर्वरित टप्पे एक दिवसाने पुढे ढकलले. काही भागांतील टप्पे दोन दिवसांनी पुढे गेले असून पाणी न दिलेल्या भागात बुधवारी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले.

Web Title: Hush...water pipeline repair complete, water supply to old city off for 29 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.