हैदराबाद मुक्ती लढा बहुस्तरीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:19 AM2018-08-06T00:19:19+5:302018-08-06T00:20:11+5:30

भारताचा स्वातंत्र्य लढा राजकीय गुलामगिरीच्या विरोधात होता. मात्र हैदराबादचा मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक, शैक्षणिक स्वातंत्र्यासाठीचा लढा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ.जनार्दन वाघमारे यांनी केले.

Hyderabad Liberation fight multi-layered | हैदराबाद मुक्ती लढा बहुस्तरीय

हैदराबाद मुक्ती लढा बहुस्तरीय

googlenewsNext
ठळक मुद्देजनार्दन वाघमारे : बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारताचा स्वातंत्र्य लढा राजकीय गुलामगिरीच्या विरोधात होता. मात्र हैदराबादचा मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक, शैक्षणिक स्वातंत्र्यासाठीचा लढा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ.जनार्दन वाघमारे यांनी केले.
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी बाबासाहेब परांजपे यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भानुदासराव चव्हाण सभागृहात रविवारी (दि.५) विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. जनार्दन वाघमारे अध्यक्षस्थानी होते. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, सचिव सूर्यकांत वैद्य, अ‍ॅड. बी. व्ही. गुणीले आणि विजय धबडगावकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी डॉ. वाघमारे यांनी हैदराबाद मुक्तिलढ्याचा समग्र आढावा घेतला. ते म्हणाले, बाबासाहेब परांजपे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मुख्याध्यापक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे १९३५ साली स्वामी रामानंद तीर्थ अंबाजोगाईला आले. तेथे शाळा सुरू केली. त्यांच्यासोबत परांजपे हेसुद्धा दाखल झाले. निजाम सरकारकडून मराठी शाळेला मान्यता मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. यातूनच स्वामी आणि परांजपे हे राजकारणात गेले. १९३७ साली बाबासाहेब हैदराबादला गेले. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. स्वामीजी सचिव बनले. यावर लवकरच निजामाने बंदी घातली. पुढे हैदराबाद स्वतंत्र होईपर्यंत स्वामीजी, बाबासाहेब खांद्याला खांदा देऊन लढत राहिले. स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब परांजपे हे बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले. त्यांनी आयुष्यभर शिक्षणाच्या प्रसारासाठी कार्य केले. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची पहिली पिढी घडविण्याचे काम त्यांनी केले. लातुरात पहिले खाजगी पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू केले. यातून शेकडो अभियंते घडविण्याचे काम केले. हैदराबाद लढ्यातही निजामाच्या विरोधात सांस्कृतिक, धार्मिक, भाषा आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी झगडावे लागले. इंग्रजांनीही केवळ राजकीय स्वातंत्र्याची गळचेपी केली होती. भाषा, धर्म, संंस्कृतीत हस्तक्षेप केला नव्हता. मात्र निजामाने हैदराबाद संस्थानात मराठी, कानडी, तेलगू भाषिकांची गळचेपी करून सर्वांवर उर्दू भाषा लादली होती.
धर्मांतरासाठी एक विभागच सुरू केला होता. उर्दूतून शिक्षण घेणे सक्तीचे होते. या संस्थानात ८५ टक्के जनता हिंदू होती. मात्र प्रशासनात केवळ १० टक्के हिंदू आणि ९० टक्के मुस्लिमांनाच संधी देण्यात येत होती.
निजामाने स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळण्याची तयारी अगोदरपासूनच सुरू केली होती. स्वतंत्र लष्कर, चलन, डाक, स्टेट बँक, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत तयार केले होते. यावरून हैदराबाद लढा हा एका स्वतंत्र राष्ट्राच्या विरोधातील होता, असेही डॉ. वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विजय धबडगावकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य इंद्रजित आल्टे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबासाहेब परांजपे यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.
हैदराबाद मुक्ती लढ्यावर प्रकाश टाका
हैदराबादच्या मुक्ती लढ्यावर आजपर्यंत कोणीही सविस्तर प्रकाश टाकला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना तर हा लढा होता, असे वाटतच नाही. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून पदभार घेतल्यानंतर याविषयीचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र त्यास मूर्त स्वरूप येतानाच कार्यकाळ संपला. पुढील कुलगुरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले.
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही अनेक वेळा हैदराबाद मुक्ती लढ्याच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची विनंती केली. मात्र कोणीही त्यावर गांभीर्याने विचार केला नसल्याची खंत डॉ.जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केली. यावर प्रकाश टाकण्यासाठी अनेक हातांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Hyderabad Liberation fight multi-layered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.