जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:33 AM2018-04-14T00:33:23+5:302018-04-14T00:34:12+5:30
‘एनओसी’ नाही : गोदापात्रातील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे कारण
संजय जाधव
पैठण : जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असताना धरणावरील जलविद्युत प्रकल्प महिनाभरापासून संबंधित विभागास बंद ठेवावा लागला आहे. यामुळे महिनाभरापासून या विद्युत प्रकल्पातून एकाही युनिटची भर विद्युत निर्मितीत पडलेली नाही. जायकवाडी प्रशासनाने विद्युत प्रकल्प चालू करण्यासाठी ‘एनओसी’ दिली नसल्याने विद्युत प्रकल्प बंद ठेवण्यात आला असल्याचे जलविद्युतचे कार्यकारी अभियंता उन्मेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जायकवाडी प्रशासनाच्या वतीने गोदापात्रातील चनकवाडी बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विद्युत प्रकल्प बंद ठेवावा, असे आदेश विद्युत विभागास देण्यात आले आहेत, असे जायकवाडी प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जायकवाडी धरणातून विद्युत निर्मिती केल्यानंतर गोदावरी पात्रात पाणी सोडले जाते. हे पाणी खाली वाहून जाऊ नये म्हणून धरणाच्या खाली पाच किलोमीटर अंतरावर चनकवाडी येथे बंधारा बांधून पाणी थोपविण्यात आले आहे. दरम्यान, या बंधाºयाच्या खाली गोदावरी पात्रात आपेगाव येथे मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. चनकवाडी बंधाºयाच्या गेटचे काम सुरू असल्याने विद्युत निर्मिती थांबविण्यात आली आहे. वास्तविक पाहता यानंतर लगेचच आपेगाव बंधारा असल्याने विद्युत निर्मितीनंतर सुटलेले पाणी या बंधाºयात थोपवले जाणार आहे. असे असतानाही केवळ पाणी वाया जाऊ नये म्हणून विद्युत निर्मिती बंद ठेवण्याचा निर्णय मोठा अजब असल्याचे मानले जात आहे.
गोदावरी पात्रातील चनकवाडी बंधाºयाच्या गेट दुरुस्तीचे काम तब्बल महिनाभरापासून सुरू आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने अत्यंत संथगतीने बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत असून यामुळे महिनाभरापासून जलविद्युत प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असताना विद्युत निर्मिती बंद ठेवण्याची दुर्दैवी वेळ विद्युत विभागावर आली आहे.
आपेगाव, हिरडपुरीसाठी पाणी
सोडा -शेतकºयांची मागणी
दरम्यान, जायकवाडी धरणातून आपेगाव व हिरडपुरीसाठी पाणी सोडा, अशी आग्रही मागणी शेतकºयांतून होत असून आपेगावच्या जि.प. सदस्या शिल्पा ज्ञानेश्वर कापसे व पैठण तालुक्यातील पदाधिकाºयांनी शासकीय स्तरावर केली आहे. यापूर्वीही जायकवाडी धरणातून आपेगाव व हिरडपुरीसाठी जायकवाडी प्रशासनास पाणी सोडावे लागले होते. यंदाही गोदाकाठच्या गावात टंचाई निर्माण झाल्याने पाणी सोडावेच लागणार आहे. त्यामुळे विद्युत निर्मितीनंतर गोदावरी पात्रात सुटणारे पाणी वाया जाणार नाही हे निश्चित आहे. या परिस्थितीत केवळ पाणी वाया जाणार म्हणून विद्युतप्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय जायकवाडी प्रशासनाने घेतल्याने विद्युत निर्मितीत तोटा झाला आहे.
१२ मेगावॅट क्षमतेचा जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातून जलविद्युत निर्मिती करताना जायकवाडी धरणातून पाणी गोदावरी पात्रात सोडले जाते. सोडलेले पाणी रात्रीच्या वेळेस पुन्हा प्रकल्पाचे टर्बाईन उलटे फिरवून गोदावरी पात्रातील पाणी धरणात ओढले जाते. या प्रक्रियेने पाण्याची बचत तर होतेच; परंतु गोदावरी पात्रात भाविकांना नेहमी स्वच्छ पाणी उपलब्ध राहते. महिनाभरापासून जलविद्युत प्रकल्प बंद पडला असून, धरणातून पाणी सुटणे व परत धरणात ओढण्याची प्रक्रिया बंद पडली आहे.
आठ-पंधरा दिवसांत सुरू होणार
चनकवाडी बंधाºयाची दुरुस्ती सुरू असून आणखी आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी दुरुस्तीसाठी लागू शकतो. दुरुस्ती होताच जलविद्युत प्रकल्प सुरू होईल.
-अशोक चव्हाण
धरण अभियंता, जायकवाडी