मी राजकारणातील जुना खेळाडू,विजय माझाच; बोगस मतदार नोंदणीवरून सत्तारांचा भाजपला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 07:43 PM2024-08-30T19:43:09+5:302024-08-30T19:45:20+5:30
निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटले असताना सत्तार यांचा विजयाबद्दल दमदार दावा
छत्रपती संभाजीनगर : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघातून मीच विजयी होईल, असा दावा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी महापालिकेतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात केला. निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटले असताना सत्तार यांनी दमदार दावा करीत मी राजकारणातील जुना खेळाडू असून त्यात चिकित्सक झालो आहे. त्यामुळे कोणाचा काय निर्णय असणार हे मला कळते, असे सूचक वक्तव्य केले.
२५ वर्षांत मी अनेकदा मंत्री झालो. अनेक जिल्ह्यांचा पालकमंत्री झालो. फक्त छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री झालो नाही हे शल्य होते, असे मन मोकळे केले.
भाजपने केली होती तक्रार...
सिल्लोड विधानसभा मतदारसंघात २७ हजार नावे दुबार असल्याचा आक्षेप घेत ती नावे मतदारयादीतून रद्द करावीत, अशी तक्रार गेल्या आठवड्यात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यात विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर, भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, माजी आ. सांडू पा लोखंडे, मकरंद कोर्डे आदींची उपस्थिती होती. त्या तक्रारीवर बोलताना सत्तार म्हणाले, संपूर्ण मतदारसंघात ६० हजार मुस्लीम मतदारांपैकी १८ हजार सिल्लोड शहरात आहेत. २७ हजार आकडा कुठून आला. आरोप करणाऱ्यांनी नीट अभ्यास करावा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
पाणीपुरवठा योजनेचा घेतला आढावा...
शहर पाणीपुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची हमी कंत्राटदार कंपनीने न्यायालयात दिली आहे. योजनेचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४, जानेवारी २०२५ मध्ये पूर्ण होईल. दुसरा टप्पा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात पूर्ण होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी महापालिकेत प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
साहसी पार्कचे लोकार्पण...
मनपाने टीव्ही सेंटर भागात स्वामी विवेकानंद उद्यानात १ कोटी ५७ लाख रुपये खर्च करून विकसित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज साहसी पार्कचे गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याठिकाणी विविध प्रकारचे ३० खेळ आहेत. आठ दिवस नागरिकांसह मुलांना येथे मोफत प्रवेश राहणार आहे. यावेळी आ. प्रदीप जैस्वाल, शहर अभियंता ए. बी. देशमुख, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आदींची उपस्थिती होती.